केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला चित्रपटगृहात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्या पाठोपाठ आता त्यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचं नाव ‘बाईपण भारी देवा’ असं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तर सध्या या चित्रपटातील ‘बाईपण भारी देवा’ हे गाणं खूप चर्चेत आलं आहे. मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या आजीने या गाण्यावर ताल धरला आहे.
सध्या ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर सोशल मीडियावर खूप रील्स व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्री अदिती द्रविडच्या आजीनेही या गाण्यावर ठेका धरला. अदिती आतापर्यंत विविध मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अदितीने आतापर्यंत अनेकदा तिला आजीबद्दल वाटणारं प्रेम सोशल मीडियावरून व्यक्त केलं आहे. तिचं तिच्या आजीबरोबर असलेलं बॉण्डिंग नेहमीच लक्ष वेधून घेतं. तर आता त्या दोघींचं एक रील सोशल मीडियावर चांगलं गाजतंय.




आणखी वाचा : “तुझी जात कोणती?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…
अदितीच्या आजीचं वय ९० पूर्ण आहे. या वयातही त्यांनी गॉगल लावून त्यांच्या नातीबरोबर फुगडी घातली आणि या गाण्यावर छान नाच केला. हा नाच करणं त्या अगदी मनापासून एन्जॉय करत असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अदितीने या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तर आता आजी-नातीच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्या दोघींचं कौतुक करत आहेतच, पण याचबरोबर आजीबद्दल विशेष प्रेम व्यक्त करत त्यांचा हा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. हा चित्रपट ३० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.