Ashwini Mahangade and Savita Prabhune : मनोरंजन सृष्टीतली अनेक मंडळी कामानिमित्त मुंबई-पुण्यात येतात. पण त्यांच्या स्मरणात कायमच त्यांचं गाव असतं. त्यामुळे गावच्या माणसांविषयी त्यांना नेहमीच एक ओढ लागून राहिलेली असते. अशीच अश्विनी महांगडेला अभिनेत्री सविता प्रभूणेंना भेटण्याची ओढ लागून राहिली होती. कारण सविता प्रभुणे आणि अश्विनी या एकाच गावच्या…

अश्विनीनं या भेटीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. अश्विनी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक किस्से, प्रसंगं किंवा काही आठवणी शेअर करताना दिसते. अशातच तिनं सविता प्रभुणे यांच्या पहिल्या भेटीची खास आठवण शेअर केली आहे. सविता यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत तिनं ही आठवण सांगितली आहे.

अश्विनीनं शेअर केलेली पोस्ट अशी आहे की…

“तुमचं गाव कोणतं? हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यापासून तर अनेक जण उत्सुकतेने हा प्रश्न विचारतात. तेव्हा माझं उत्तर असतं पसरणी… म्हणजे वाईपासून ३ किलोमीटर अंतरावर माझं गाव. बऱ्याचदा असं व्हायचं की, ‘तुम्हाला सविता प्रभुणे माहीत आहेत का? त्याही वाईच्या आहेत. भेटलाय का कधी त्यांना?’ मी त्यांना या आधी कधीच भेटले नाही. पण मनात कायम यायचं की, आमची भेट खास असेल आणि मी सांगेन त्यांना की ‘मी सुद्धा वाईची’ आणि अखेर आमची भेट झाली.”

“‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या सेटवर आम्ही भेटलो. मनात खूप प्रश्न होते की, माहीत नाही त्या कशा बोलतील, सगळं नको सांगायला, आपण फार नको बोलायला, त्यांना नाही आवडलं तर… असे अनेक मुद्दे मेंदूच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पळत होते. पण सविता ताई एवढ्या गोड हसत आल्या की संपला विषय..

सविता ताई आल्या आल्याच म्हणाल्या, ‘३ दिवस झाले; तुझी वाट पाहतेय. तू वाईची ना… (गेम पलटी) त्यानंतर अर्धा तास त्यांनी मला जवळपास हात धरून कसे मैत्रिणीला गल्ली न गल्ली फिरवतो; तसे वाईच्या सगळ्या गल्ल्यामधले किस्से ऐकवले. त्यांच्याबरोबर त्यांच्या वेळी असलेली वाई ऐकताना खूप समाधान वाटलं. अनेक माणसांची नावं त्यांनी आदराने घेतली. माणूस कमानिमित्त बाहेर असेल खरा पण त्याच्या मनात जे गाव वसलेलं असतं ते किती गोड असतं.

‘मन रानात गेले गं’ऐवजी ‘मन वाईत गेलं गं’ हेच गाणं वाजू लागलं. सविता ताईंच्या सगळ्या आठवणी एका भेटीत कशा संपतील? पण प्रवास सुरू होणं गरजेचं असतं आणि तो झाला. मग या सगळ्या कलाकारांवर प्रेम करणाऱ्या सविताताई हळूहळू समजू लागल्या.

“आणि आणि आणि… शेवटी समजलं की, आम्ही दोघी ‘किसनवीर महाविद्यालय वाई’ या एकाच कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत. शिवाय खामकर पेढे हा जीवाचा विषय. त्यांच्याही आणि माझ्याही. आता मी सांगू शेकन की, हो मी त्यांना भेटले.”

दरम्यान, अश्विनीनं शेअर केलेल्या या पोस्टखाली तिच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा त्यांच्या वाईच्या काही आठवणी शेअर सांगितल्या आहेत. तसंच ‘ग्रेट भेट’, ‘वाईच्या पोरी’, ‘दोघी उत्तम अभिनेत्री आहात’, ‘आमच्या वाईचा अभिमान’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.