Gaurav More New Home Chhaya Kadam Post : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेने ५ एप्रिल रोजी त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. अभिनेत्याचं नवीन घर पाहण्यासाठी मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. याशिवाय गृहप्रवेशाच्या दिवशी गौरवने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. गौरव लग्नबंधनात सुद्धा अडकला आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे प्रियांका कारेकर.

गौरवचं पवईतील हे नवीन घर पाहण्यासाठी लोकप्रिय मराठी अभिनेत्री छाया कदम सुद्धा पोहोचल्या होत्या. गौरव आणि त्याच्या पत्नीसह छाया कदम यांनी खास फोटो शेअर केले आहेत. याशिवाय त्यांनी गौरवसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

छाया कदम यांची पोस्ट

स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात…आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या लहानापासून प्रेमात वेडा असलेला गौरव मोरे… पुढे त्याच्या स्वप्नातलं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार… आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो.

Award Banner

जिद्द – चिकाटी आणि भारावलेपण घेऊन, अमिताभजींच्या प्रेमात ‘भूतनाथ’ झालेला गौरव, पुढे परिस्थितीच्या सगळ्या ‘दिवार’ तोडत, सोबत ‘शहेनशाह’चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी ‘शोले’ भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर ‘डॉन’ सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना ‘वजीर’ होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो… आणि हेच त्याचं आपलेपण गौरवला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ बनवतं.

कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो…आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेलं त्याचं झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे, आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवचा गृहप्रवेश झाला.

गौरव! तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस… अजून खूप मोठा हो! इतका मोठा हो की, एक दिवस तुझ्या यशाचा ‘जलसा’ करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे. तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा… आणि घरासह तुझ्या आयुष्यात आलेल्या जोडीदाराला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका!

बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’…. अभिनय क्षेत्रातील तुझं ‘सरकार राज’ अबाधित ठेवो.

खूप खूप प्रेम… शुभेच्छा!
आणि शेवटचं….
“परंपरा – प्रतिष्ठा और अनुशासन…मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन.”

दरम्यान, छाया कदम यांच्या पोस्टवर कमेंट करत गौरवने “ताई…खूप-खूप प्रेम” असा रिप्लाय दिलं आहे. गौरवला हे नवीन घर म्हाडा लॉटरीत लागलं होतं. या नव्या घराच्या प्रवेशद्वारावर अभिनेत्याने ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी नेमप्लेट लावली आहे.