‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आजपासून (२० नोव्हेंबर) ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका सुरू होत आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका रात्री ९.३० प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी मालिकेतील कलाकारांचे पहिले लूक समोर आले आहेत. कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार? याची माहिती ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियाद्वारे देण्यात आली आहे.
‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्रामवर ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील भूमिकांची ओळख करून दिली आहे. सुरुवातीला ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. ईशा ही कला खरे या भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत हुशार, बुद्धीमान, तत्वांना धरून चालणारी. हातकाम, रंगकला, चित्रकला आणि दागिने बनवणे हे तिचे आवडीचे काम अशी कलाची वैशिष्ट आहेत. तसेच पक्का बिझनेस मॅन, परफेक्शनिस्ट, पैशाचा माज असणार, तत्त्वांना धरुन चालणार, मोठ्यांचा आदर करणाऱ्या अद्वैत चांदेकरच्या भूमिकेत अभिनेता अक्षर कोठारी पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नात ‘या’ जोडीने वेधलं लक्ष, दोघांचे फोटो होतायत व्हायरल
मालिकेतील मध्यवर्ती भूमिका जितकी महत्त्वाची असते तितकीच खलनायिकेची भूमिका महत्त्वाची असते. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली पानसरे दिसणार आहे. यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दीपाली संजना या खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रीमंतीचा बढेजाव करणारी, नवऱ्याला सोडून माहेर येऊन राहिलेली, प्रॉपर्टीवर डोळा असणारी अद्वैतची आत्या रोहिणी या भूमिकेत दीपाली पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ईशा केसकर, अक्षर कोठारी, दीपाली पानसरे, किशोरी अंबिये व्यतिरिक्त मिलिंद ओक, ध्रुव दातार, अपूर्वा सपकाळ असे अनेक कलाकार मंडळी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत झळकणार आहेत.