Tharala Tar Mag Fame Actress : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील सगळीच पात्रं आता घराघरांत लोकप्रिय झाली आहेत. यामध्ये सायलीच्या जिवलग मैत्रिणीची म्हणजेच कुसुमताईची भूमिका अभिनेत्री दिशा दानडे साकारत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून कुसुम ताई ‘ठरलं तर मग’मध्ये दिसत नाहीये.
मधुभाऊ कोमात आहेत, याशिवाय आश्रम केसचा निकाल सुद्धा लागला आहे. त्यामुळे आता कुसुम आश्रमाकडे लक्ष देतेय असं मालिकेत काही महिन्यांपूर्वी दाखवण्यात आलं होतं. आश्रम केस जिंकल्यामुळे आता सायली-अर्जुनचं पूर्ण लक्ष प्रियाची खरी ओळख नेमकी काय आहे? हे शोधण्याकडे आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कथानकानुसार गेल्या काही दिवसांपासून कुसुमताई मालिकेत झळकलेली नाहीये.
मात्र, काही दिवसांपूर्वीच कुसुमची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा दानडे ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकताना दिसली होती. ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत दिशा दानडेची एन्ट्री झालेली आहे. तिच्या भूमिकेचं नाव बेबी आत्या.
दिशा दानडे काय म्हणाली?
दिशा सांगते, “बेबी आत्या…मी जिंकून घेईन सारं! ही माझी नवीन भूमिका आहे… नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं माझ्या वाट्याला आलं आहे. आशा आहे तुम्हाला आवडेल…रोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर…नक्की बघा! एकत्र छान प्रवास करूयात.”
दिशाची ही पोस्ट पाहिल्यावर आता ही अभिनेत्री पुन्हा ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका चाहतीने अभिनेत्रीला याबद्दल प्रश्न सुद्धा विचारला आहे. “ताई आता तुम्ही ‘ठरलं तर मग’मध्ये दिसणार नाही का?” या प्रश्नावर उत्तर देताना दिशा म्हणाली, “तिथे पण येईन…नक्की”
याचा अर्थ दिशाने अद्याप ‘ठरलं तर मग’ मालिकेचा निरोप घेतलेला नाहीये. कथानकाच्या गरजेनुसार ती पुन्हा मालिकेत झळकू शकते. अनेकांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर “आम्ही तुम्हाला ठरलं तर मग मालिकेत खूप मिस करतोय” अशा कमेंट्स सुद्धा या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत दिशासह जान्हवी तांबट, भारती आचरेकर, अमित रेखी, अमृता फडके, संचित चौधरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
