मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिची धाकटी बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. त्या नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून त्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करीत असतात. कधी कधी एकमेकींबद्दलचं प्रेम व्यक्त करतात तर कधी कधी एकमेकींच्या तक्रारीही करताना दिसतात. तर आज मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त गौतमीने खास पोस्ट लिहिली आहे.
आज मृण्मयी देशपांडे हिचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावरून तिचे चाहते त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील तिची मित्रमंडळी तिच्याबरोबरचे विविध फोटो पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच गौतमीने मृण्मयीचा एक व्हिडीओ शेअर करीत तिचा कधीही न दिसणारा अंदाज सर्वांसमोर आणला आहे.
आणखी वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…
गौतमीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये मृण्मयी मौजमस्ती करताना, गौतमीला त्रास देताना, त्यांच्या पाळीव कुत्र्याला सांभाळताना, भेळपुरी खाताना, गौतमीला मारताना, आईचा ओरडा खाताना, नाचताना, लाड करून घेताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत गौतमीने लिहिलं, “हॅपी बर्थडे ताई…मला कॅप्शन लिहायचा कंटाळा येतो… बाकी व्हिडीओमध्ये सगळं बोललं आहे छान छान तशीच आहेस तू…. बाकी ते ‘आय लव्ह यू’ वगैरे सगळं आहेच… PS- मी दत्तक घेतलेली नाहीये. ता. क. – माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर (स्वप्निलपेक्षा जास्त मी प्रेम करते तुझ्यावर!)”
आता तिने पोस्ट केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर कमेंट करत नेटकरी त्या दोघींची ही केमिस्ट्री आवडल्याचं सांगत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर कमेंट करून सर्व जण मृण्मयीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.