Marathi Actress Girija Oak : मराठीसह बॉलीवूड मनोरंजनसृष्टी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. गिरिजा सध्या ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. तिचे निळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर देशभरात सर्वत्र गिरिजाची चर्चा होऊ लागली. अभिनेत्री ‘नॅशनल क्रश’ म्हणून सर्वत्र ट्रेंड होऊ लागली. चाहत्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं यासाठी गिरिजाने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले होते. याशिवाय, मॉर्फ केलेल्या आक्षेपार्ह फोटोंवर तिने तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती.
गिरिजाने नुकत्याच अमोल परचुरेंना दिलेल्या कॅचअपच्या मुलाखतीत ‘नॅशनल क्रश’ या तिच्या टॅगबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. “याला प्रसिद्धीची लाट म्हणतात…ही लोकप्रियता जशी आली, तशी ती ओसरणार” असं मत यावेळी गिरिजाने व्यक्त केलं.
‘नॅशनल क्रश’चा टॅग कोणाला चोरायचाय?
गिरिजा म्हणाली, “मी हल्लीच एका पेजवर पाहिलं… बऱ्याच मराठी अभिनेत्रींना असं विचारण्यात आलं की, तुम्हाला कोणाकडून काय चोरावंसं वाटेल? त्यापैकी बहुतेक जणींनी गिरीजा ओककडून म्हणजेच माझ्याकडून माझं ‘नॅशनल क्रश’चं टायटल चोरावंसं वाटेल असं उत्तर दिलं. तर, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. मी तर म्हणेन प्लीज चोरा! प्लीज घेऊन जा…हा खूप छान अनुभव आहे.”
प्रसिद्धी एका लाटेसारखीच…
“नॅशनल क्रश झाल्यावर अर्थात खूप मजा येते… खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात…अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात. पण, मी याआधी सुद्धा सांगितलं आहे आणि माझ्या एका लेखातही मी म्हटलं होतं की, याला प्रसिद्धीची लाट म्हणतात. खरंच ही प्रसिद्धी एका लाटेसारखीच असते ती येते…आणि मग ती लाट जाते सुद्धा! त्यामुळे आपण या गोष्टीची देखील तयारी ठेवली पाहिजे की, ही लोकप्रियता जशी आलीये… तशी ती कधीतरी ओसरणार सुद्धा आहे. त्यानंतर मग पुन्हा तुमचं नॉर्मल आयुष्य सुरू होईल.” असं मत गिरिजाने व्यक्त केलं.
दरम्यान, गिरिजा ओक अलीकडेच ‘हॅलो बच्चो’ या नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकली. याशिवाय गिरिजाच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या सीरिजना देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
