अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. तर आता सोशल मीडिया स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर्सना एक प्रश्न विचारला आहे.
सध्या इंटरनेटच्या वाढलेल्या वापरामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, रील स्टार्स यांचा चाहता वर्ग खूप वाढला आहे. हे रील स्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अनेकदा वेगवेगळ्या ब्रँडच्या कपड्यांचं प्रमोशन करताना दिसतात. त्यांच्या या अशा प्रकारच्या व्हिडीओंवर हेमांगी कवीने उत्सुकतेपोटी एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
आणखी वाचा : “काहीपण लिहायचं आणि….,” नेटकऱ्याच्या कमेंटवर हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…
हेमांगीने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ती म्हणते, “मला एक प्रश्न पडला आहे की, सोशल मीडियावरच्या ज्या फॅशन इन्फ्लुएन्सर्स आणि स्टायलिस्ट असतात, त्या रोज किंवा दर आठवड्याला किंवा प्रत्येक सणाला काय काय नवीन कपडे मागवले आहेत ते दाखवत असतात. त्या कपड्यांचे पार्सल उघडतानाचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि नंतर ते सगळे कपडे घालून दाखवतात हे मी पाहते. मला त्यांना एक विचारायचे आहे की, एवढे कपडे तुम्ही मागवता. नंतर तुम्ही ते ५-६ वेळा घालत असाल. पण नंतर त्यांचं करता काय? मुळात एवढे कपडे ठेवता कुठे?”
हेही वाचा : ‘मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते पण…’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकली हेमांगी कवी
पुढे ती म्हणाली, “आतापर्यंत माझ्याकडे जेवढे कपडे जमा झाले आहेत त्यांकडे पाहून मला असं वाटतं की मी खूप पाप करते आहे. सहा-सहा महिने मी शॉपिंग करत नाही. ऑनलाईन शॉपिंगही वर्षातून एकदा करते. तरीसुद्धा माझ्याकडे जे कपडे आहेत त्याचा मला त्रास होतो. तुम्ही सांगता हे तुम्ही ते कपडे पाचशे रुपयांच्या आत किंवा हजार रुपयांच्या आत खरेदी केले आहेत. पण म्हणजे तुम्ही काय फोर बीएचके किंवा फाईव्ह बीएचके अशा बंगल्यात राहत नसाल. आमच्यासारख्या छोट्या मोठ्या घरांमध्ये नाही असाल. तुम्ही त्या सगळ्या कपड्यांचं काय करता? आणि तुम्ही एवढे सगळे कपडे कुठे ठेवता?” तर आता हेमांगीचं हे भन्नाट रील नेटकऱ्यांना चांगलंच आवडलं आहे. त्यावर कमेंट करत तिथे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.