आपल्या अभिनयाचा अविरत ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांना ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’मधील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, प्रभावी आवाजाने आणि अजरामर व्यक्तिरेखांनी त्यांनी अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा, कलेप्रती असलेल्या निष्ठेचा आणि मराठी मनोरंजनविश्वातील मोलाच्या योगदानाचा सन्मान म्हणजे हा जीवनगौरव पुरस्कार!
इला ताई नेहमी म्हणतात, मी या इंडस्ट्रीत खूप उशिरा आले, पण त्यांचं इथे येणं हे ठरलेलं होतं हे मात्र नक्की. म्हणूनच मेरिटमध्ये आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवून देखील इला ताई रंगमंचावर रमल्या. वडील नंदा पाटकर यांचा वारसा घेऊन त्यांनी मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.
या क्षेत्रात येताना इला ताईंच्या आवाजावरही टीका झाली पण ‘शब्दांशी खेळा’ त्यावर प्रेम करा, ‘शब्द हे अभिनयाचं गर्भरूप आहे’, हे डॉक्टर अशोक रानडे यांचे शब्द त्यांच्यासाठी अभिनय क्षेत्रात मंत्र ठरले आणि ज्या आवाजावर कधी टीका झाली, पुढे त्याच आवाजाने अखंड महाराष्ट्राला माया लावली. ‘आवाज’ कधीच चांगला-वाईट नसतो, त्याला आपली ओळख बनवता आलं पाहिजे हे इला ताईंनी दाखवून दिलं.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यावर इला भाटे म्हणाल्या, “जेव्हा मी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला आणि माझ्या आजवरच्या प्रवासाचा व्हिडिओ पाहत होते, तेव्हा माझं मन आनंद, समाधान आणि कृतज्ञतेने भरून गेलं होतं. एवढी वर्षं आपण काम केलं, याचं मलाच आश्चर्य वाटत होतं. माझ्या गुरूंनी नेहमी सांगितलं होतं की, सातत्याने काम करत राहा. त्या क्षणी त्यांच्या शब्दांची आठवण झाली. माझ्या या प्रवासात ज्यांन-ज्यांनी मला साथ दिली, त्या सगळ्यांची आठवण झाली आणि मी मनोमन त्यांना नमस्कार केला. पुन्हा एकदा हा सगळा प्रवास अनुभवता आला तर किती छान होईल, असंही वाटून गेलं.”
“या सगळ्या भावनांमध्ये सगळ्यात जास्त आठवण आली ती माझ्या आईची. हा क्षण पाहण्यासाठी आज माझी आई हवी होती, असं मनापासून वाटलं. जीवनगौरव पुरस्कार म्हणजे आजवर केलेल्या कामाची पोचपावती, प्रेक्षकांची पसंती आणि त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी आहे. पण त्याचबरोबर यापुढेही असंच चांगलं काम करत राहण्याची अपेक्षा आणि त्यासाठी मिळणारी नवी ऊर्जा आहे. सध्या मी झी मराठीच्या ‘कमळी’ मालिकेत आजीची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करता येत आहेत, याचा मला विशेष आनंद आहे. आपण भूतकाळात काय केलं, हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच वर्तमानात काय करत आहोत आणि भविष्यात काय करू शकतो, हेही महत्त्वाचं आहे.” अशा भावना इला भाटेंनी व्यक्त केल्या आहेत.
