टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीला देवों के देव… महादेव, महाभारत, पवित्र रिश्ता, दिया और बाती हम यांसारख्या मालिकांमधून लोकप्रियता मिळाली. तिने २०२२ मध्ये स्वतःशीच लग्न करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, तिने आता या नात्यातूनही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिष्का सोनीने काही वर्षांपूर्वी टीव्ही इंडस्ट्री सोडली. आता ती लॉस एंजेलिसमध्ये राहते. तिने हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करणार असल्याचं म्हटलं होतं. कनिष्काने २०२२ मध्ये स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आपल्याला कोणत्याही पुरुषाची गरज नाही, स्वतःची स्वप्ने पूर्ण करू शकते, असं वक्तव्य करणारी कनिष्का आता ती स्वतःसाठी जोडीदार शोधत आहे. कनिष्काने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून तिला कसा जोडीदार नवरा हवा, त्या अपेक्षा सांगितल्या.
कनिष्का सोनीला कसा मुलगा हवा?
३८ वर्षांची कनिष्का म्हणाली, “मला असा पुरुष हवा आहे जो ३-४ महिन्यांत पश्चिम लॉस एंजेलिसमध्ये तिच्याशी लग्न करेल. तो खूप देखणा असावा, उंच असावा. त्याने धूम्रपान करू नये, हुक्का किंवा ड्रग्ज घेऊ नये, दारू पिऊ नये, शिवीगाळ करू नये. शांत असावा, हसत बोलणारा असावा, शाकाहारी असावा. त्याने माझ्याबरोबर निसर्ग आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करावे. माझी जबाबदारी घ्यावी आणि माझ्याबरोबर गोंडस मुलं जन्माला घालावीत. एक घर आणि शांत, आध्यात्मिक जीवन हवं आहे.”
मी २२ मध्ये स्वतःशीच लग्न केलं…
कनिष्काने कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं, “मी खूप इंट्रोव्हर्ट आहे. पण मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मला असं वाटतं की कोणीतरी माझे आयुष्य माझ्याबरोबर शेअर करावं. मला समजून घ्यावं. मला असं वाटतं की कोणीतरी असावं जे माझ्यावर प्रेम करेल. ज्या सकारात्मकतेने मी जगाकडे पाहते, तसं पाहील. ज्या पद्धतीने मी माझ्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहतो, तसं पाहील. मला माहित आहे की मी २०२२ मध्ये स्वतःशी लग्न केलं, आता चार वर्षे झाली आहेत. आता मी स्वतःला घटस्फोट देत आहे. मी कधीही क्लबमध्ये जात नाही, मी अजिबात लोकांमध्ये मिसळत नाही. मी घरीच राहते. मला स्वतःसाठी स्वयंपाक करायला आवडतं.”
आतापर्यंत मी एकटीच जगलेय – कनिष्का
“मी शाकाहारी, कांदा-लसूण न वापरता किती छान स्वयंपाक करते हे कोणीतरी समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य एकटीच जगलेय, एकटीच फिरलेय. आता मला कोणीतरी माझी जबाबदारी घ्यावी असं वाटतं. मी मॅट्रिमोनियल साइट्सवर ३,००० हून अधिक मुलांना रिजेक्ट केलंय. कारण त्यापैकी कोणीही माझं मन जिंकलं नाही. मला आशा आहे की माझा मिस्टर राईट ही पोस्ट वाचेल आणि माझ्यापर्यंत पोहोचेल,” असं कनिष्का सोनीने लिहिलं.

