‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. शिवाय बऱ्याच नव्या, जुन्या कलाकारांची इतर मालिकांमध्ये एन्ट्री होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘देवयानी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याची ‘अबोली’ मालिकेत दमदार एन्ट्री झाली. अभिनेता माधव देवचके सहा वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकला. श्रेयस सुमन मराठे अशी माधवची व्यक्तिरेखा असून तो ‘अबोली’च्या विरोधात केस लढताना पाहायला मिळत आहे. पण अशातच ‘अबोली’ मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. यासंदर्भात तिनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलं आहे.

अभिनेता सचित पाटील व गौरी कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली ‘अबोली’ मालिका ही ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचा प्राइम टाइम नसला तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी लोकप्रिय ‘अबोली’ मालिका अभिनेत्री मीनाक्षी राठोडने सोडली आहे. याबाबत तिनं चाहत्यांना स्वतः सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: कौतुकास्पद! प्रसिद्ध गायिकेनं ३००० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री मीनाक्षी राठोडने ‘अबोली’ मालिकेत निता सुर्वेची भूमिका साकारली होती. पण आता मीनाक्षीचा निता म्हणून प्रवास थांबला आहे. निताच्या व्यक्तिरेखेतील फोटो शेअर करत मीनाक्षीनं लिहिलं आहे, “अबोली मधला निताचा प्रवास इथेच थांबवतेय. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर माझ्या प्रत्येक पात्रावर खूप केलं आणि यापुढे ही ते अबाधित राहील याची खात्री आहे. नवीन भूमिकेसाठी लवकरच भेट होईल. तोपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर भेटतच राहू.” मीनाक्षीच्या या पोस्टवर चाहत्यांची तुझी आठवण येत राहिल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये शालिन भनोटला २०० हून अधिक विंचवांनी केला दंश! धक्कादायक व्हिडीओ आला समोर

दरम्यान, मीनाक्षीनं ‘अबोली’ मालिकेत साकारलेली निता सुर्वेची भूमिका सुरुवातीला अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने साकारली होती. हे पात्र शर्मिष्ठाने आपल्या अभिनयाने एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. पण मीनाक्षीनं शर्मिष्ठानंतर निता पात्र उत्कृष्टरित्या पेललं. अजिबात तिनं निता पात्रातील बदल जाणवू दिला नाही.

याआधी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत देवकीचं पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. पण काही काळानंतर मीनाक्षीनं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सोडली. पण तिनं साकारलेल्या देवकी पात्राची अजूनही प्रेक्षकांना आठवण येते.