सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर साधारण २ वर्षांपूर्वी ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची फ्रेश जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची वेळ बदलण्यात आली. आता सध्या रात्री ११ वाजता ही मालिका प्रसारित केली जाते. पण, रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा या सिरियलला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी जीजी ही भूमिका साकारत आहेत. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार आता नीना कुलकर्णी या मालिकेचा निरोप घेणार आहेत. याबद्दल त्यांनी स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

नीना कुलकर्णी यांच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. सर्व कलाकारांनी नीना कुलकर्णींचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याबरोबर खास फोटोशूट सुद्धा केलं.

नीना कुलकर्णी लिहितात, “जीजी गेली… मनाला चटका लावून… ‘येड लागलं प्रेमाचं’ या ‘स्टार प्रवाह’वरच्या मालिकेतील माझं काम संपलं. गेली २ वर्षे मालिकेचं अविरत चित्रीकरण केलं…जीजीचा दरारा मोठा… त्यामुळे तिचे सीन्स सुद्धा तसेच होते…मोठे आणि जिवंत. दमछाक व्हायची, पण सर्वांनी सांभाळून घेतलं. अगदी सहकलाकारांपासून ते क्रिएटिव्ह, दिग्दर्शक, प्रोडक्शन, कॅमेरा टिम, मेकअपची मंडळी, हेअर ड्रेसर, कपडेपट…. स्पॉट बॉईज आणि त्यांचे सुग्रास पदार्थ! सगळेच मनमिळाऊ आणि हसतमुख. या सेटवर… ना कधी वाद झाले, ना कधी मतभेद. आम्ही सगळे सामोपचाराने काम करायचो. असा अनुभव विरळाच. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा! कितीतरी सुरेख आठवणींचा ठेवा बरोबर घेऊन निघाले आहे.”

star pravah serial
नीना कुलकर्णी आता जीजीच्या भूमिकेत झळकणार नाहीत, मालिकेतून एक्झिट

दरम्यान, नीना कुलकर्णी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत “आम्ही जीजीच्या भूमिकेला मिस करू” असं म्हटलं आहे. आता लवकरच या मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणेंची एन्ट्री होणार आहे. आता किशोरी शहाणे कोणती भूमिका साकारणार? त्यांच्या एन्ट्रीनंतर राया-मंजिरीच्या आयुष्यात काय घडणार? हे लवकरच प्रेक्षकांसमोर स्पष्ट होतील.