Prajakta Mali : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी लाखो मुलांची क्रश आहे. मराठी मालिका, सिनेमांमधून ती कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. याशिवाय प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुराही सांभाळत आहे. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी प्राजक्ताला तिच्या चाहत्यांनी असंख्य प्रश्न विचारलs. या सगळ्या प्रश्नांची अभिनेत्रीने दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.

प्राजक्ता माळीला तिचे चाहते लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारत असतात. आपली आवडती अभिनेत्री विवाहबंधनात केव्हा अडकणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, सारखे-सारखे लग्नाबद्दलचे प्रश्न विचारल्यावर अनेकदा तणाव जाणवतो. याचसंदर्भात एका नेटकऱ्याने प्राजक्ताला प्रश्न विचारला आहे.

“लग्न करण्यासाठीचा दबाव, प्रेशर कसं काय मॅनेज करतेस? कधी मागे पडल्यासारखं वाटतं का? किंवा या सगळ्याचं कधी दडपण येतं का?” या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता माळी लिहिते, “मला असं वाटतं…योग्यवेळी योग्य गोष्टी घडतील, आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे तुमचं आहे…ते कधी ना कधी तुमच्याजवळ येणारच आहे.”

“आता घरच्यांना ही Philosophy समजावणं अवघड आहे…ते मलाही जमत नाही”, असंही प्राजक्ता माळीने या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं आहे.

prajakta mali wedding pressure
प्राजक्ता माळीने ‘आस्क मी सेशन’मध्ये दिलं दिलखुलास उत्तर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुद्धा सोशल मीडियावर एका चाहत्याने प्राजक्ताला “राष्ट्रीय प्रश्न आहे. तू लग्न कधी करणार?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्राजक्तानेही हटके उत्तर दिलं होतं. ती म्हणाली होती, “हा माझ्या आई-वडिलांचा प्रश्न असला पाहिजे. ना की तुमचा”

दरम्यान, प्राजक्ता माळी आता ‘फुलवंती’ सिनेमाच्या यशानंतर कोणत्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. प्राजक्ता आजच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्री, निर्माती आणि यशस्वी उद्योजिका म्हणून देखील ओळखली जाते. तिच्या ज्वेलरी ब्रँडला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.