Prajakta Mali Maharashtrachi Hasyajatra : सध्याच्या काही लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांच्या यादीत नंबर वन असलेला शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शोमधील अनेक हास्यवीर आपल्या विनोदी स्किट्सने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. शोचे केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे; तर जगभरात चाहते आहेत. अशातच प्राजक्ता माळीनं या शोमधील तिचा आवडता कलाकार कोण, हे सांगितलं आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सातासमुद्रापार पोहोचली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच या शोमधील कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. अनेक दिग्गजांनी शोला नावाजलं आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर हेदेखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचे रसिक आहेत. रोज हा शो बघत असल्याचे त्यांनी याआधी कबुल केलं आहे. शोमधील सगळेच विनोदी कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत.
अशातच प्राजक्ता माळीनं तिचा आवडता कलाकार कोण, याबद्दल तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे विविध लुक्समधील फोटो शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिनं तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि या संवादात तिनं चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी तिला एका चाहत्यानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तुझा आवडता कलाकार कोण?’ असा प्रश्न विचारला.
चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्तानं कुणाचंच नाव घेतलेलं नाही. ती फक्त “तुम्हाला तर माहितीच आहे… दादा…” इतकंच म्हणाली. दरम्यान, तिच्या या उत्तरावरून तिला समीर चौघुले हे नाव सुचवायचे असल्याचं कळतंय. कारण या शोमधील तिचं ‘वाह दादा वाह’ हे वाक्य समीर चौघुलेंमुळेच व्हायरल झालं आहे.

मराठी मालिका, सिनेमे आणि रिअॅलिटी शोजमधून प्राजक्ता माळीनं चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. व्यवसाय, अभिनय यात सक्रिय असणारी अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. तिनं ‘पांडू’, ‘खो-खो’, ‘वाय’, ‘हंपी’, ‘फुलवंती’सारख्या सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच ती ‘देवखेळ’ या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
