Priyadarshini Indalkar Diagnosis dengue : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) सध्या विविध माध्यमांवर काम करत आहे. चित्रपट, वेबसिरीज, आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांत ती आपली भूमिका साकारत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून सर्वांना खळखळून हसवणारी ही अभिनेत्री आता सगळ्यांच्या चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. प्रियदर्शिनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती सध्या आजारी असल्याची माहिती दिली आहे.
प्रियदर्शिनीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या फोटोमध्ये तिच्या हातावर पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत, तसेच तिच्या हातात सलाईनची सुई दिसत आहे. प्रियदर्शिनीने ज्या हाताला सलाईन लावले आहे, तो हात गालावर ठेवलेला आहे. प्रियदर्शिनीने ज्या हाताला सलाईन लावलं आहे तो हात गालावर ठेवला असून तिने या फोटोसह छोटीशी कॅप्शन लिहिली आहे.
प्रियदर्शिनीने या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये ‘हॅलो डेंग्यू’ असं लिहिलं आहे. यावरून तिला डेंग्यूची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. मराठी सिनेसृष्टीतील या फुलराणीने काल रात्री इन्स्टाग्रामवर ही स्टोरी पोस्ट करत सर्वांना तिच्या आजारपणाबद्दल माहिती दिली. मात्र तिने केवळ डेंग्यूची लागण झाल्याचं सांगितलं असून, तिच्या सध्याच्या तब्येतीबद्दल अधिक तपशील दिलेला नाही.
दरम्यान, नुकतीच प्रियदर्शिनी ‘नवरदेव बीएससी अॅग्री’ या सिनेमात झळकली होती. तिला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे शाखेचा कै. इंदिरा चिटणीस स्मृती विनोदी अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याचबरोबर तिला नुकताच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. गुरु ठाकूरच्या “मिळे ओंजळीला, जसे चांदणे…” या ओळींसह तिने ही आनंदवार्ता इन्स्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केली होती.
प्रियदर्शिनीने मराठी वेबसिरीजसह हिंदी वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. २०२३ मध्ये आलेल्या शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या वेबसिरीजमध्ये ती एक छोटी भूमिका साकारताना दिसली होती, तर मराठीत ‘शांतीत क्रांती’ वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये तिने भूमिका केली होती. प्रेक्षकांना खळखळून हसवण्याबरोबरच प्रियदर्शिनी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकतंच तिचं ‘स्पंद अंतरीचे’ हे प्रेमगीत यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे.