Ruchira Jadhav on Breakup with Rohit Shinde: ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात एका रिअल लाइफ जोडीने सहभाग घेतला होता. पण शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. ही जोडी म्हणजे अभिनेत्री रुचिरा जाधव व रोहित शिंदे. दोघेही तीन वर्षे नात्यात होते, मग ते बिग बॉसच्या घरात एकत्र गेले होते. सुरुवातीला गोडीगुलाबीने राहणाऱ्या रोहित व रुचिरामध्ये नंतर मतभेद होऊ लागले. दोघांचे मतभेद इतके विकोपाला गेले होते की त्यांचं नातं तुटलं. इतकंच काय तर दोघेही ग्रँड फिनालेला देखील आले नव्हते. आता तीन वर्षांहून जास्त काळ लोटल्यानंतर रुचिराने त्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ फेम रुचिरा जाधव टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रुचिराचे सुंदर फोटो व व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्याचबरोबर रुचिरा स्पष्टवक्ती आहे. ती तिची मतं ठामपणे मांडत असते. आता ब्रेकअपबद्दल बोलताना तिने त्या निर्णयानंतर तिच्या आई-वडिलांना तिचीच चूक असल्याचं वाटत होतं, असंही सांगितलं.

बिग बॉसबद्दल मनात नकारात्मकता होती – रुचिरा जाधव

“बिग बॉस माझ्यासाठी नेहमी खास यासाठी राहील, कारण तिथे ज्या काही गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या, त्यानंतर दोन वर्षे मी वेगळ्याच विचारात होते. काही गोष्टी मला नीट क्लिअर झाल्या नव्हत्या. मी फॅमिली वगैरे सारख्या गोष्टींसाठी फार अटॅच होते. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ज्या प्रकारे लोकांसमोर आल्या, त्याबद्दलही माझ्या मनात नकारात्मकता होती. त्यामुळे मधल्या काळातील मुलाखतींमध्ये मी बिग बॉसचं नाव फार पॉझिटिव्हली घेतलं नव्हतं,” असं रुचिरा जाधव राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

पंढरपूरला दर्शनाला गेले आणि सगळं नीट झालं – रुचिरा जाधव

“मी गेल्या वर्षी जुलै महिन्यात माझ्या वाढदिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी मी खूप संभ्रमात होते. मी विठुरायाला फक्त एवढंच साकडं घातलं की, जे काही आहे ते सगळं नीट कर. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन-तीन दिवसांतच अशा काही गोष्टी समोर आल्या, ज्या पूर्णपणे अनपेक्षित होत्या. त्यामुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला,” असं रुचिरा जाधवने नमूद केलं.

बिग बॉसमध्ये गेले नसते, तर चुकीच्या घरात गेले असते – रुचिरा जाधव

“काही गोष्टी मला माहित होत्या, पण माझ्या आईवडिलांपासून मी त्या लपवल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात अंतर निर्माण झालं होतं. त्यांना मी चुकीची वाटत होते, पण जुलै महिन्यात सगळं स्पष्ट झालं, त्यामुळे गैरसमज दूर झाले आणि पुन्हा एकदा कुटुंबात संवाद सुरू झाला. बिग बॉसनंतर मला आजही अनेक प्रेक्षकांचे मेसेज येतात. मला त्यांना हेच सांगायचंय की, जर मी त्यावेळी बिग बॉसच्या घरात गेले नसते, तर कदाचित आज मी चुकीच्या घरात असते. आज मी माझ्या हक्काच्या घरात सुरक्षित आहे, याचे सगळे श्रेय मी बिग बॉसला देते, कारण तिथे गेल्यामुळेच अनेक गोष्टींचे सत्य समोर आले,” असं रुचिरा जाधव ठामपणे म्हणाली.

रुचिराने आता नात्याच्या जुन्या आठवणी मागे सारल्या आहेत. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्याने आता बिग बॉस पाहू शकतेय, पण आधी त्रास होत होता. जुन्या चुकांमधून शिकून पुढे जातेय, असंही रुचिरा जाधवने सांगितलं.