मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर बस सेवा खूप सुलभ आहे. अनेक जण टॅक्सीच्या ऐवजी बसने फिरणं पसंत करतात. यामध्ये अनेक कलाकारांचाही समावेश आहे. पण, आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बेस्ट बसचालकाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो बसचालक चक्क मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहे. हे दृश्य सर्वांसमोर आणणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजा बागवे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत ती अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिच्या कामाबरोबरच तिला समाजातील खटकणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. आणखी वाचा : Video: ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली… ऋतुजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेस्टच्या बसमधून मुंबईत प्रवास करताना दिसली. तिची बस एका सिग्नलवर थांबली असताना बसचा चालक मात्र मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न होता. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, "बेस्ट." तिने समोर आणलेलं हे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हेही वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत दरम्यान, ऋतुजा काही दिवसांपूर्वी 'अथांग' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमधील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर आता ऋतुजा कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये झळकणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.