Actress Sharmila Shinde : ‘पुढचं पाऊल’, ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच शर्मिला शिंदे. आपल्या अभिनयाने ती कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आलीये. खलनायिका असो किंवा सकारात्मक भूमिका…शर्मिलाने साकारलेली सगळीच पात्रं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतात. शर्मिलाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असते. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या एका अनोख्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अलीकडच्या काळात फ्लॅटच्या बाल्कनीत सुंदर कुंड्या सजवून अनेकजण विविध रोपट्यांची लागवड करतात. बाल्कनीत रोपं लावताना सूर्यप्रकाशाची दिशा, योग्य कुंड्यांची निवड आणि नियमित पाणी देणं यांसारख्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
अभिनेत्री शर्मिला शिंदेने काही दिवसांपूर्वी या सगळ्या गोष्टींची काळजी घेत, यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला तिच्या नव्या घरच्या बाल्कनीत हिरव्या मिरचीचं रोपटं लावलं होतं. जुलै-ऑगस्ट हे महिने रोपांच्या वाढीसाठी सर्वोत्तम मानले जातात. या काळात बिया लवकर रुजतात आणि रोपांची वाढ झपाट्याने होते. हलक्या-भुसभुशीत मातीत हिरव्या मिरच्यांची शेती केली जाते.
ही रोपं दररोज ४ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावी लागतात. बिया पेरल्यावर साधारण ६० ते ८० दिवसांमध्ये मिरच्या या रोपाला दिसू लागतात. ही सगळी प्रक्रिया फॉलो करत शर्मिलाने बाल्कनीत हिरव्या मिरचीचं पीक घेतलं. “बाल्कनी मधली शेती” असं कॅप्शन शर्मिलाने या व्हिडीओला दिलं आहे.
घरच्या घरी रोपट्याला आलेल्या ताज्या हिरव्या मिरच्या काढल्यावर अभिनेत्रीने त्या बारीक चिरुन घेतल्या. तसेच मिरच्यांची चटणी बनवली. ही चटणी तिने दुपारी जेवताना ताटात सर्व्ह केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
शर्मिलाने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिची ही शेतीची अनोखी संकल्पना सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत शर्मिला निकिता ही भूमिका साकारत आहे. ती समरची जवळची मैत्रीण असते. याशिवाय शर्मिला ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ या नाटकात सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय.
