Tinnitus Symptoms, Causes, Treatments: ‘ठरलं तर मग’मधून सुमन किल्लेदार (सुमनकाकी) म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रद्धा केतकर-वर्तक. श्रद्धाने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या कानासंबंधित आजाराबद्दलचा खुलासा केला आहे. श्रद्धाला टिनिटस (Tinnitus) हा कानासंबंधित आजार आहे. गेली १७ वर्षं ती या आजाराचा सामना करतेय.

याबद्दल मुलाखतीत श्रद्धा म्हणाली, “माझ्या कानात जुन्या कुकरच्या शिटीसारखा आवाज येतो. कुकरची शिटी जितकी जोरात वाजते, तसाच आवाज माझ्या कानात वाजतो. मला सुरुवातीला वाटलेलं की, हे सर्दीमुळे होत आहे; पण ते टिनिटस (Tinnitus) आजारामुळे होत होतं. तेव्हा सुरू झालेले आवाज मला आजही ऐकू येतात.”

पुढे ती म्हणाली, “तेव्हा मला खूप त्रास झाला; पण आता मी त्याची सवय करून घेतली आहे. कारण- त्यावर काहीच उपाय नाही. तो शिटीचा आवाज काही केल्या जात नाही. त्याचा परिणाम माझ्या ऐकण्याच्या क्षमतेवर झाला. यावरील सर्जरीचा सक्सेस रेट मला तेव्हा कमी सांगितला होता. सर्जरी करूनही मला येणारे आवाज बंद होतील, ही शाश्वतीसुद्धा नव्हती. त्यामुळे मी सर्जरीचा विचार केला नाही.” दरम्यान, हा टिनिटस (Tinnitus) नेमका काय आहे, त्यावरील उपचार आणि लक्षणे काय आहेत, याबद्दल जाणून घेऊ.

Award Banner

टिनिटस (Tinnitus) आजार म्हणजे काय?

टिनिटस (Tinnitus) म्हणजे बाहेर कोणताही आवाज नसतानाही आपल्याला कानात आवाज ऐकू येणे आणि हा आवाज प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतो. त्यात घंटी वाजल्यासारखा, शिटीसारखा, गुंज किंवा सतत काहीतरी चालू असलेला आवाज येतो. तसेच काही जणांना हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाजही ऐकू येतो. हा आवाज एकाच कानात, दोन्ही कानांत किंवा डोक्याच्या आत जाणवू शकतो.

डॉक्टर कुरळे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाब, अ‍ॅनिमिया (रक्ताची कमतरता), थायरॉईडचा असमतोल, रक्तवाहिन्यांमध्ये साठलेली चरबी (अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस), तसेच कानाजवळील रक्तवाहिन्यांत झालेला बदल यांमुळे रक्तप्रवाह वेगाने होत असल्यास असा आवाज ऐकू येऊ शकतो. त्याशिवाय मेंदूतील दाब वाढणे, ज्याला आयडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन म्हणतात, हेही यामागील एक महत्त्वाचे कारण असू शकते.

टिनिटसमुळे होणारा त्रास हा अनेक वेळा गंभीर नसतो; मात्र काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टर कुरळे सांगतात की, जर हा आवाज सतत ऐकू येत असेल आणि फक्त एका कानातच जाणवत असेल, तर तो गंभीर ठरू शकतो. त्यासोबत डोकेदुखी, चक्कर येणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा आवाज हळूहळू वाढत असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात सतत ऐकू येत असेल, तर त्याकडेही दुर्लक्ष करू नये.

तपासणी आणि उपचार कसे केले जातात?

या त्रासाचं कारण शोधण्यासाठी सर्वप्रथम कानाची तपासणी आणि ऐकण्यासंदर्भातील चाचण्या केल्या जातात. गरज भासल्यास एमआरआय किंवा सीटीस्कॅन करून कानाची रचना आणि आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी केली जाते. काही प्रकरणांत कॅरोटिड डॉप्लर चाचणी किंवा मेंदूतील दाब वाढला आहे का हे पाहण्यासाठी डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

डॉक्टर कुरळे सांगतात की, कानातील मळ काढणे किंवा संसर्गावर उपचार केल्यास अनेकदा हा त्रास आपोआप कमी होतो. जर शरीरातील इतर समस्या कारणीभूत असतील, तर रक्तदाब नियंत्रणात ठेवणे किंवा अ‍ॅनिमियावर उपचार करणे उपयुक्त ठरते. काही वेळा रक्तवाहिन्यांतील त्रुटींमुळे हा त्रास होत असल्यास विशेष औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज लागू शकते. कोणतेही गंभीर कारण न आढळल्यास रुग्णांना धीर देणे, तसेच साउंड थेरपी किंवा टिनिटस रिट्रेनिंग थेरपीसारखे उपचार उपयोगी पडतात, ज्यामुळे मेंदूचे त्या आवाजाकडे जाणारे लक्ष कमी होते.

टिनिटस कमी करण्यासाठी काय करावे?

  • मोठ्या आवाजापासून कानांचे संरक्षण करा
  • ताण कमी करा (योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम)
  • पूर्ण झोप घ्या
  • कॅफिन, सिगारेट आणि दारू कमी करा
  • डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या