गेल्या काही वर्षांत अनेक लोकप्रिय कलाकारांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं. ‘वादळवाट’सारख्या सदाबहार मालिकेतून चाहत्यांची मनं जिंकून घेणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून लोकेश गुप्ते यांना ओळखलं जातं. अलीकडेच त्यांच्याही लेकीने मालिकाविश्वात पदार्पण केलं. शुभवी काही महिन्यांपूर्वी अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अशोक मा.मा.’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत होती. आता नुकतीच तिची एन्ट्री ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झालेली आहे.

शुभवीने अल्पावधीतच आपल्या सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. याशिवाय शुभवीला आई-बाबांचं सुद्धा उत्तम मार्गदर्शन लाभलं आहे. तिने नुकताच आपला २० वा वाढदिवस साजरा केला. शुभवीने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शुभवीने २० व्या वाढदिवशी स्वत:साठी नवीन गाडी खरेदी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वकष्टाने नवीन कार विकत घ्यायची हे शुभवीचं स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झालं आहे. सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, हर्षदा खानविलकर या सगळ्यांनीच शुभवीच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

याशिवाय शुभवीने खास रेस्टॉरंटमध्येही बर्थडे सेलिब्रेशन केलं. याचेही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “Chapter 20: sweeter, wiser & happier” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

तर, लाडक्या लेकीच्या वाढदिवशी लोकेश गुप्ते लिहितात, “वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम! पालक म्हणून आम्हाला तुझा नेहमीच अभिमान वाटत आला आहे आणि इथून पुढेही राहील…देवाकडे हीच प्रार्थना आहे की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत…यशस्वी हो..आणि जशी आहेस तशीच रहा”

दरम्यान, शुभवीची आई चैत्राली गुप्ते सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. सध्या चैत्राली ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर, लोकेश गुप्ते ‘झी मराठी’च्या ‘शुभ श्रावणी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. यासह शुभवी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकतेय.