Actress Shweta Shinde on Marathi Industry Groupism and Nepotism : बॉलीवूडमध्ये असलेलं ग्रुपिझम (गटबाजी) नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. अनेकदा हे ग्रुपिझम दिसूनही येतं. तसेच मराठीतल्या ग्रुपिझमबद्दलही अनेकदा चर्चा होताना दिसते. मराठी सिनेसृष्टीत होत असलेल्या गटबाजीवर इंडस्ट्रीतले काही कलाकार व्यक्त होत असतात. काहींनी गटबाजी असल्याचे उघडपणे सांगितलं आहे, तर काही याबद्दल आडून आडून बोलतात.

अशातच आता मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमबद्दल अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेनं तिचं मत व्यक्त केलं आहे. श्वेता शिंदेनं आजवर अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती काही वर्षांपासून निर्माती म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेतानं मराठीतल्या ग्रुपिझम आणि नेपोटिझमबद्दल प्रतिक्रिया दिली.

भार्गवी चिरमुलेशी साधलेल्या संवादात श्वेताला ग्रुपिझमबद्दल विचारलं गेलं, तेव्हा ती म्हणाली, “मला वाटतं कन्फर्ट झोनमुळे ग्रुपिझम होत असेल. याचं उदाहरण द्यायचं झालं, तर हेमंत ढोमे. हेमंतच्या चित्रपटांमध्ये सारखेच कलाकार दिसतात. कारण- एका पॉईंटनंतर त्याचा कलाकाराबरोबर कन्फर्ट झोन तयार होत असेल. त्या कलाकाराला हेमंत ओळखायला लागतो. त्यामुळे तशा भूमिका लिहिल्या जातात. माझ्याकडेसुद्धा तीच तीच माणसं पुन्हा पुन्हा कामासाठी एकत्र येत असतात. हे कन्फर्ट झोनमुळेच होतं. बाकी ग्रुपिझम वगैरे असं काही नसतं.”

Award Banner

त्यानंतर श्वेतानं नेपोटिझमबद्दलही तिचं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “नेपोटिझममुळे तुम्हाला एक संधी मिळू शकते. म्हणजे माझ्या मुलीलासुद्धा मी एक संधी देऊ शकते. पण त्या एका संधीमध्ये तिला काही करता आलं नाही, तर मग कुणी काही करू शकत नाही. एक संधी मिळाल्यानंतर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागणारच आहे. त्यासाठी टॅलेंट, मेहनत, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी याशिवाय पर्याय नाही. आलिया भट्ट ही महेश भट्टची मुलगी आहे म्हणून यशस्वी नाहीय. तिनंदेखील स्वत:ला सिद्ध केलं आहे.”

त्यानंतर एखाद्या नेपोकिडचे दोन-तीन चित्रपट फ्लॉप होऊनसुद्धा त्याला पुन्हा संधी मिळते; पण एखाद्या नवख्या कलाकाराच्या बाबतीत ते होत नाही. हेच मालिकाविश्वातसुद्धा होतं का? असं तिला विचारण्यात आलं. त्यावर श्वेता म्हणते, “मालिका इंडस्ट्रीत असं होत नाही. हे क्षेत्र खूप मेहनतीनं काम करणाऱ्यांचं आहे. त्यात सातत्य महत्त्वाचं आहे. सातत्यानं एखादी भूमिका केल्यानंतर आणि ती भूमिका प्रेक्षकांना आवडली, तर मग यश तुमचंच आहे. याचं उदाहरण म्हणजे हर्षदा खानविलकर. ती कंटाळतच नाही. ती मला एकदा म्हणालेली की,, ती अनेक वर्षंं एकच भूमिका करू शकते. त्यामुळे सातत्यानंं तुम्ही या इंडस्ट्रीत अनेक वर्षंं काम करू शकता.”