बॉलीवूडसह मराठी मनोरंजनविश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत, ज्यांचं एकमेकांशी खास नातं आहे. फक्त नवरा-बायको नाही तर भाऊ-बहीण, नणंद-भावजय, बापलेक, सख्ख्या किंवा मावस बहिणी अशी बरीच नाती आपल्याला कलाविश्वात पाहायला मिळतात. मराठी कलाविश्वात असंच एक मावस भावंडांचं त्रिकुट आहे ज्यांच्याबद्दल फार कोणाला माहिती नाहीये. हे तिघेजण नेमके कोण आहेत पाहुयात…

अभिनेत्री सोनाली खरे, माधवी निमकर आणि संगीत संयोजक व संगीतकार ‘चला हवा येऊ द्या’ फेम तुषार देवल ही तिघंही भावंडं आहेत. काही वर्षांपूर्वी तुषार आणि त्याची पत्नी स्वाती देवल यांनी एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता.

स्वाती देवल व सोनाली खरे या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दोघी एकाच शाळेत एकाच बेंचवर बसायच्या. शिवाय दोघी एकाच डान्स क्लासला जायच्या. दोघींचं एकमेकींच्या घरी येणं-जाणं असायचं. पण स्वातीला सोनाली खरे ही पती तुषार देवलची मावस बहीण असल्याचं माहीत नव्हतं. ही गोष्ट स्वातीला लग्नानंतर समजली, असं तिनं या मुलाखतीत सांगितलं.

सोनाली खरे आणि माधवी निमकर या दोघी सख्ख्या मावस बहिणी आहेत. त्यामुळे माधवी देखील तुषारची मावस बहीण लागते असं तुषार देवलने या मुलाखतीत सांगितलं होतं.

सोनाली खरे सध्या स्टार प्रवाहच्या ‘नशीबवान’ मालिकेत उर्वशी ही खलनायिकेची भूमिका साकारतेय. तर, माधवी निमकर ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेत तायडीच्या भूमिकेत झळकतेय… ही सुद्धा निगेटिव्ह भूमिका आहे. या दोन्ही बहिणींची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते, याशिवाय यांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे.

madhavi sonali
अभिनेत्री माधवी निमकर, तुषार देवल आणि अभिनेत्री सोनाली खरे ( Marathi Actors Sonali Khare, Madhavi Nimkar And Tushar Deval )

तुषार देवलबद्दल सांगायचं झालं तर, आजवर अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी संगीतकार म्हणून जबाबादारी सांभाळली आहे आणि त्याची पत्नी स्वाती देवल ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत मंगल ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय.