Surbhi Jyoti Sumit Suri Separate Rooms: ‘नागिन’ फेम अभिनेत्री सुरभी ज्योती व सुमित सुरी यांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं. दोघांनी काही वर्षे डेट केल्यावर पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. सुमित अतिशय शांत स्वभावाचा आहे. सुरभीच्या मते तिचा व सुमितचा स्वभाव सारखा आहे. घरात दोघांच्या स्वतंत्र खोल्या आहेत, कारण त्यांना त्यांची ‘स्वतःची जागा’ हवी आहे.
सुरभी ज्योतीने घरात त्याच्या व सुमितच्या खोल्या वेगळ्या का आहेत, याबद्दल सांगितलं. शूटिंग नसेल तेव्हा सुरभी व सुमित दोघेही घरात राहणं पसंत करतात.
सुरभी ज्योती व सुमित सुरी राहतात वेगळ्या खोलीत
सुरभीने खुलासा केला की, ती व तिचा पती दोघेही घरून काम करणं पसंत करतात, त्यामुळे त्यांनी घरात स्वतःच्या वेगळ्या खोल्या असाव्या असा परस्पर निर्णय घेतला. ती म्हणाली, “तोही घरून काम करतो, मीही, शूटिंग नसेल तेव्हा घरूनच काम करते. आम्हाला बाहेर जाण्याची इच्छा नसते, आम्ही फक्त आमच्या घरात राहून खूप आनंदी असतो. आमच्या घरात, आमच्या आवडीनुसार स्वतंत्र खोल्या आहेत. कारण तो त्याच्या आयुष्यातील बराच काळ एकटाच राहिला आहे आणि माझ्या बाबतीतही काहिसं असंच होतं. त्यामुळे आम्ही हा परस्पर निर्णय घेतला. नवरा बायकोच्या खोल्या वेगळ्या असणं हे दुर्मिळ आहे.”

सुरभीने तिच्या व सुमितच्या वेगवेगळ्या खोल्या असण्याबद्दल सांगितलं. “माझे स्वतःचे कपाट, माझे स्वतःचे वॉर्डरोब, माझे स्वतःचे बाथरूम आणि माझी जागा आहे. कधीकधी तो स्वतःच्या खोलीत असतो, मी माझ्या खोलीत असते. तरीही, आम्ही एकत्र असतो. मी असे म्हणत नाही की वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहूनच तुम्ही एकमेकांना मोकळीक देऊ शकता, पण हो. आम्ही एकामेकांना अशा प्रकारे स्पेस देत आहोत,” असं सुरभी म्हणाली. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहून दोघांना आनंद मिळतो, पण सर्वांसाठी हा पर्याय कामाचा असेल, असं नाही.
सुरभी ज्योती व सुमित सुरी यांनी लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. दोघांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट रिसॉर्टमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय व काही मोजकेच मित्र-मंडळी उपस्थित होते. सुरभीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘कबूल है’, ‘इश्कबाज’, ‘नागिन ३’ या मालिका व ‘गुनाह’ वेब सीरिजसाठी ओळखली जाते.