Tejashree Pradhan : कलाकार म्हणून काम करताना अनेकदा अशा भावना पडद्यावर उभ्या कराव्या लागतात, ज्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक असतात. सध्या ‘झी मराठी’वरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत असंच एक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेची नायिका ‘स्वानंदी’ म्हणजेच तेजश्री प्रधान हिने नुकताच एक ‘ड्रंक सीन’ शूट केला. नायिकेच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लावता आणि स्वानंदीचा भाबडेपणा जपून तेजश्रीने हा सीन कसा पूर्ण केला.

या सीनबद्दल सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, “एक कलाकार म्हणून हा संपूर्ण सीन माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. जेव्हा तुम्ही नायिकेची भूमिका साकारता, तेव्हा तुमच्यावर मोठी जबाबदारी असते. नायिकेची एक प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात असते आणि अनेकजण तिचं अनुकरण करत असतात; त्यामुळे त्या प्रतिमेचं भान ठेवूनच काम करावं लागतं.”

तेजश्री प्रधान पुढे म्हणाली, “स्वानंदी’च्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा हा सीन पूर्णपणे वेगळा होता. दारू प्यायल्यानंतर मिळणाऱ्या त्या तात्पुरत्या स्वातंत्र्याचा वापर करून, स्वानंदीने तिच्या चौकटीबाहेर जाऊन भावना व्यक्त केल्या. जेव्हा मला समजलं की, स्वानंदीसाठी असा सीन लिहिला गेलाय, तेव्हा मला खूप आनंद झाला. सहसा नायिकेच्या वाट्याला काही ठराविक साचेबद्ध गोष्टीच येतात, त्या पलीकडे जाऊन तिला वागता येत नाही. पण या निमित्ताने काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळणार असल्याने माझ्यातला कलाकार सुखावला. खऱ्या आयुष्यात मी ड्रिंक करत नाही, त्यामुळे मित्रमंडळींसोबत बाहेर गेल्यावर मी त्यांची ‘ड्रायव्हर’ असते. मुंबई पोलिसांची शिस्त अतिशय कडक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ती पाळतोच. अशा सीन्ससाठी माझे ड्रिंक करणारे मित्रच माझे ‘इन्स्पिरेशन’ ठरतात. जेव्हा तुम्ही पार्टीत असूनही ड्रिंक करत नसाल, तेव्हा तुम्हाला इतरांचं निरीक्षण करण्याची छान संधी मिळते. ते कसे बोलतात, कसे वागतात, हे सर्व मला बारकाईने पाहता येतं. यापूर्वीही एका मराठी चित्रपटात मी असा सीन केला होता, ज्यासाठी मला त्या वर्षीचे सहाय्यक अभिनेत्रीचे पुरस्कारही मिळाले होते.”

“तांत्रिक अडचण असल्याशिवाय मी साधारणपणे मॉनिटरवर जाऊन माझे शॉट बघत नाही. मला स्वतःला पडद्यावर पाहणं मला थोडं कठीण वाटतं, कारण जर आपण स्वतःलाच आवडलो नाही, तर पुढच्या कामात आपण गोंधळून जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत दिग्दर्शक ‘ओके’ म्हणतोय, तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवून मी पुढे जाते. या सीनमध्ये मला स्वानंदीपेक्षा खूप वेगळं वागायचं होतं, त्यामुळे काम करताना खूप मजा आली. ज्या स्वानंदीवर प्रेक्षक प्रेम करतात, तिचा भाबडेपणा कुठेही कमी होऊ नये, याचे भान ठेवूनच लेखकांनी हा सीन लिहिला आहे आणि दिग्दर्शकांनी तो उत्तमरीत्या शूट केला आहे. माझ्यासाठी ही एक पर्वणीच होती.” असं तेजश्रीने सांगितलं.

स्वानंदीच्या पात्राबद्दल कोणती गोष्ट आवडते याबद्दल तेजश्री म्हणाली, “मला स्वानंदीबद्दलची एक गोष्ट विशेष आवडते, ती म्हणजे चॅनेल आणि क्रिएटर्सनी तिला कुठेही टिपिकल रडणाऱ्या नायिकेसारखं दाखवलेलं नाही. तिच्यासोबत जे काही घडतंय, त्याबद्दल ती नेहमी प्रश्न विचारते. जिथे ती बोलू शकत नाही, तिथे व्यक्त होण्याची मुभा या ‘दारूच्या सीन’मुळे स्वानंदीला मिळाली. मला आशा आहे की प्रेक्षकांना स्वानंदीचं हे रूपही नक्कीच आवडेल.”