सारीपाट, सागरगोटे असे अनेक खेळ काही वर्षांमध्ये कालबाह्य झाले आहेत. हे खेळ मोजकीच मंडळी खेळताना दिसतात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री सारीपाटाच्या डावामध्ये रमली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

सारीपाट खेळाचा आनंद घेणारी ही अभिनेत्री म्हणजे उमा पेंढारकर. ‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ अशा मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या ती मनोरंजनसृष्टीपासून दूर जाऊन काही दिवसांसाठी न्यूझीलंडला राहायला गेली आहे. आता अशातच तिने तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेऊन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गेली न्यूझीलंडला, परदेशातून सुरु केलं ऑनलाईन काउन्सिलिंग, म्हणाली…

उमाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती सारीपाट खेळताना दिसत आहे. तिच्या कुटुंबीयांबरोबर तिने काही दिवसांपूर्वी तिच्या गावी या खेळाचा आनंद घेतला. तिच्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी तिला हा खेळ शिकवला. या व्हिडीओमध्ये ती या खेळाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलेय, ‘कोकण म्हणजे आठवणींचा खजिना. त्यातलीच एक आठवण म्हणजे सारीपाट. गावतलेच प्रो-भिडू गोळा करून आजही घरातली मोठी मंडळी हा खेळ खेळतात. खूप छोट्या गोष्टीही खूप मोठा आनंद देतात; त्याचं हे उदाहरण.’

हेही वाचा : “पायाजवळ घोणस आली आणि…”; उमा पेंढारकरने सांगितला शूटिंगदरम्यानचा चित्तथरारक अनुभव

आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं, “हे शकुनीमामाचे फासे वाटत आहेत.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “जिंकलात तर पार्टी हवी.” तर ‘स्वामिनी’ मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता अभिषेक रहाळकर कमेंट करत म्हणाला, “अरे! ही तर शकुनीउमा सॉरी मामा.” याचबरोबर अनेकांनी उमाला सारीपाट येतो हे कळल्यावर तिचं कौतुक केलं.