Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘धाकट्या सूनबाई’ या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेची निर्मिती ‘कोठारे व्हिजन’कडून केली जाणार आहे. तसेच यामध्ये नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे मुख्य भूमिका साकारणार आहे. पहिल्यांदाच ती लीड अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. आता हळुहळू या मालिकेची अन्य स्टारकास्ट सुद्धा रिव्हिल करण्यात येत आहे.
झी मराठीच्या ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमात ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेचा हिरो कोण होणार? हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. आता नायक-नायिकेची जोडी रिव्हिल केल्यानंतर झी मराठीने शेअर केलेल्या आणखी एका प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
या व्हिडीओमध्ये एका ज्येष्ठ अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय. तर कॅप्शनमध्ये लिहिलंय, “चाल तिची अंगार, नजरेची तलवार, Swag तिचा बाणेदार…झी मराठीवर येतेय गोष्ट दमदार!” आता या नेमक्या कोण आहेत? हे चाहत्यांना ओळखायचं होतं. पण, कमेंट्समध्ये आधीच सर्वांनी या दुसऱ्या-तिसऱ्या कोणीही नसून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी असल्याचं ओळखलं आहे.
या पोस्टवर ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री मेघा धाडेने सुद्धा खास कमेंट केली आहे. मेघाने या व्हिडीओवर उषा नाडकर्णींसाठी प्रेमाने “आऊ” अशी कमेंट केली आहे. आता मेघाच्या कमेंटमुळे उषा नाडकर्णी ‘झी मराठी’वर कमबॅक करणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. तसेच उषा नाडकर्णी ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याच्या चर्चाही गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत.

आता उषा नाडकर्णींच्या अधिकृत एन्ट्रीचा जबरदस्त प्रोमो केव्हा प्रदर्शित होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेला ‘झी मराठी’वर कोणता स्लॉट मिळणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.
रम्यान, ‘धाकट्या सूनबाई’मध्ये चिन्मयी आणि मंदार यांची ऑनस्क्रीन जोडी झळकणार आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेमुळे मंदारला घराघरांत नव्याने एक ओळख मिळाली होती. आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता ‘झी मराठी’वर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय चिन्मयीबद्दल सांगायचं झालं तर, ती नागपूरची आहे. पहिल्यांदाच ती लीड अभिनेत्री म्हणून काम करणार आहे. यापूर्वी चिन्मयी रंगभूमीवरील नाटकांमध्ये आणि ‘प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची’ या मालिकेत झळकली आहे.
