Pavitra Rishta Actress Usha Nadkarni Personal Life: ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेतून आणि अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेल्या ८० वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी गेल्या ३९ वर्षांपासून मुंबईत एका फ्लॅटमध्ये पूर्णपणे एकट्या राहतात. त्या स्वतःची सगळी कामे स्वतःच करतात. पतीपासून खूप आधीच विभक्त झालेल्या उषा नाडकर्णी यांच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले.

उषा नाडकर्णी त्यांच्या पतीबद्दल बोलणं टाळतात. पण ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीत, उषा नाडकर्णींनी सांगितलं होतं की त्या पतीपासून खूप आधीच विभक्त झाल्या होत्या. आपल्या मनात पती किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणताही द्वेष नाही. बरेचदा नाडकर्णी कुटुंबाला जेवायला बोलावलंय, असंही त्यांनी नमूद केलं. उषा नाडकर्णींना एक मुलगा असून तो सध्या परदेशात राहतो, पण लहानपणीही तो उषा यांच्या आईकडे राहायचा.

मुलगा म्हणतो, तू मला फक्त जन्म दिलाय – उषा नाडकर्णी

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत यापूर्वी उषा यांनी सांगितलं होतं की, त्यांचा मुलगा अभिजीत त्यांच्या भावाच्या मोठ्या घरात वाढला, कारण त्या नेहमी कामात व्यग्र असायच्या. त्यामुळे त्यांच्या मुलाचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला. “मला वेळ मिळेल तेव्हा मी त्याला भेटायला जायचे. ठरलेली अशी कोणतीच वेळ नसायची. एकाच दिवसात अनेक प्रयोग असल्याने मराठी नाटकांमध्येच माझा सगळा वेळ जायचा. माझा मुलगा आजही मला म्हणतो की, ‘तू मला फक्त जन्म दिलाय, माझी खरी आई तर माझी आजीच होती,'” हे सांगताना उषा नाडकर्णी भावुक झाल्या होत्या.

३९ वर्षांपासून एकट्या राहतात उषा नाडकर्णी

उषा नाडकर्णी आता एकट्या पडल्या आहेत. कारण त्यांचा मुलगा परदेशात राहतो आणि त्यांच्या सर्व भावंडांचे निधन झाले आहे. १९८७ पासून, म्हणजेच गेल्या ३९ वर्षांपासून त्या एकट्याच राहतात. एकटेपणा वाटतो का? असं विचारल्यावर उषा म्हणाल्या, “मला आता याची सवय झाली आहे. मी १९८७ पासून एकटी राहतेय. मला आता अजिबात भीती वाटत नाही. सुरुवातीला मी जेव्हा या इमारतीत राहायला आले, तेव्हा कोणीतरी हल्ला करेल या भीतीने मी गार्डला माझ्या दरवाजापर्यंत सोबत यायला सांगायचे. पण आता मला भीती वाटत नाही.”

usha-nadkarni-pavitra-rishta-actress-living-alone-husband-separation
अभिनेत्री उषा नाडकर्णी (फोटो- एक्सप्रेस आर्काइव्ह)

जर मी झोपेतच मेले तर… उषा नाडकर्णींचं वक्तव्य

मृत्यूबद्दल मनात येणाऱ्या विचारांवरही उषा नाडकर्णी बोलल्या होत्या. एकट्या राहत असल्याने मृत्यू झाल्यास कोणाला कळेल की नाही, असा प्रश्न अनेकदा त्यांच्या मनात येतो. तरीही, आयुष्यात पुढे काय होईल याची त्यांना भीती वाटत नाही. “आपण कसे मरणार हे कोणीच सांगू शकत नाही. काही जण झोपेतच जातात, तर काहींचा रुग्णालयात मृत्यू होतो. मला या गोष्टीची जराही भीती वाटत नाही. जर मी झोपेतच मेले, तर माझे शेजारी येऊन दरवाजा ठोठावतील आणि विचार करतील, ‘म्हातारीने दरवाजा उघडला नाही’.”

उषा नाडकर्णी यांचं बालपण

उषा नाडकर्णींचे वडील हवाई दलात अधिकारी होते आणि त्यांची आई शिक्षिका होत्या. उषा नाडकर्णी यांनी अभिनेत्री व्हायचंय हे आईला सांगितलं होतं, पण आईनेही पाठिंबा दिला नव्हता. “मला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण माझ्या आईचा याला विरोध होता. ती एक शिक्षिका होती आणि तिचं म्हणणं बरोबरही होतं. आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो. आमचे शेजारी आमच्या आयुष्यात खूप लुडबूड करणारे होते. मी चौथीत असताना पहिल्यांदा अभिनय केला होता, आता मी ८० वर्षांची आहे आणि आजही अभिनय करत आहे,” असं ‘तुम हो ना – घर की सुपरस्टार’ या कार्यक्रमात उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या.