Actress working with Twin daughters in same serial: इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे भाऊ-बहीण, आई-वडील, पती-मुलगा-मुलगी-बायको किंवा इतर नातेवाईकही मनोरंजनसृष्टीत काम करतात. त्यामध्ये मीरा व मधुरा वेलणकर या बहिणी, त्यांचे वडील प्रदीप वेलणकर तसेच मधुरा वेलणकरचे सासरे हे शिवाजी साटम आहेत.

तसेच, पल्लवी वैद्य व पूर्णिमा तळवलकर या बहिणीदेखील विविध मालिकांमध्ये काम करताना दिसतात. तितीक्षा तावडे व खुशबू तावडे या बहिणीदेखील विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकर, हेमंत ढोमे-क्षिती जोग हे पती-पत्नी त्यांच्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे जवळचे नातेवाईक याच इंडस्ट्रीमध्ये काम करतात. पण, अगदी मोजक्याच वेळा त्यांना एकाच मालिकेत, चित्रपटात, नाटकात किंवा वेब सीरिजमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळते. मात्र, एक अभिनेत्री व तिच्या दोन जुळ्या मुली एकाच मालिकेत काम करत आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?

लागिरं झालं जी या मालिकेत मामी या भूमिकेतून अभिनेत्री विद्या सावळेला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर जीव झाला वेडापिसा, तसेच राजा राणीची गं जोडी, सिंधूताई माझी आई अशा लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने विविध भूमिका साकारल्या. अभिनेत्रीच्या सर्व भूमिकांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेत्री इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत काम करीत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीबरोबर तिच्या दोन्ही जुळ्या मुली याच मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. निकिता आणि नेहा शिंदे अशी त्यांची नावे आहेत.

“म्हणूनच ही जुळ्यांची जबाबदारी मला कधी जबाबदारी…”

आता अभिनेत्रीने मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलींचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले, “आज माझ्या जुळ्या मुलींचा वाढदिवस. माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस. माझ्या छकुल्या पाहता पाहता २३ वर्षांच्या झाल्या. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान, नशीबवान समजते आणि क्षणाक्षणाला परमेश्वराचे आभार मानते की, त्यानं खूप सुंदर अशा जुळ्या पऱ्या माझ्या पदरात टाकल्या.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले, “खरं सांगायचं तर त्या माझ्यापेक्षा माझ्या आईच्या वाट्याला जास्त आल्या. त्यांच्या संगोपनात माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईवडिलांचा हात आहे. म्हणूनच ही जुळ्यांची जबाबदारी मला कधी जबाबदारी वाटलीच नाही.
माझ्या संघर्षात माझ्या मुलींचा म्हणजेच नेहा (ऋजुता) व निकिताचा महत्त्वाचा वाटा आहे. त्या खूप प्रेमळ, समंजस आहेत. खरं तर आई म्हणून प्रत्येक आईला आपल्या बाळाचं कौतुकच असतं; पण खरंच त्यांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.”

विद्या सावळेने असेही लिहिले, “आज आम्ही तिघी मायलेकी कॉन्स्टेबल मंजू/ इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या माध्यमातून एकत्र टेलिव्हिजनची स्क्रीन शेअर करतोय यासारखा मोठा आनंद जगात दुसरा कोणताच नाही, असं मला वाटतं. त्याचप्रमाणे एकत्र वेळ घालवण्याची इतक्या वर्षांची कसर या दोन वर्षात भरून निघाली. प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेतोय. त्यामुळे मायलेकीच्या नात्याचं रूपांतर आता मैत्रीत झालं आहे.”

मुलींना आशीर्वाद देत अभिनेत्रीने लिहिले की, तुम्ही नेहमी अशाच हसत राहा, विचारांनी सुसंस्कृत व्हा. तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होवोत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

दरम्यान, अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करीत नेहा व निकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.