‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले यांचा घटस्फोट झालाय, अशा चर्चा होत आहेत. कारण योगिता व सौरभ दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलंय. इतकंच नाही तर त्यांनी एकमेकांबरोबरचे लग्नाचे, हनिमूनचे व इतर सर्व फोटोही सोशल मीडियावरून हटवले आहेत. आता घटस्फोटाच्या चर्चांवर योगिता चव्हाणने प्रतिक्रिया दिली आहे.
यंदाची दिवाळी सौरभ चौघुले व योगिता चव्हाणने वेगवेगळी साजरी केली. सौरभने त्याचे एकट्याचे फोटो पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर योगिता चव्हाणने मित्र-मैत्रिणींबरोबर दिवाळी साजरी केली. यानंतर अचानक या दोघांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांबरोबरचे कोणतेच फोटो ठेवले नाहीत, असं दिसून आलं. मग त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्या.
घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाली योगिता चव्हाण?
न्यूज 18 लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, योगिता चव्हाणने घटस्फोटाच्या चर्चांवर बोलणं टाळलं. आपल्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच बोलायचं नाही, असं योगिताने म्हटलंय. तर याप्रकरणी सौरभ चौघुलेशी संपर्क होऊ शकला नसल्याचं वृत्तही त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, सौरभ चौघुले व योगिता चव्हाण यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत मुख्य भूमिका केल्या होत्या. या मालिकेतील मल्हार व अंतरा खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकल्याने चाहत्यांना खूप आनंद झाला होता. अजूनही चाहते त्यांच्या फोटोंवर मल्हार व अंतरा या त्यांच्या पात्रांच्या नावानेच कमेंट्स करत असतात. पण आता दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याचं ऐकून त्यांना मोठा धक्का बसला आहे.
सौरभ व योगिता यांनी थाटामाटात ३ मार्च २०२४ रोजी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर दीड वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण सौरभ किंवा योगिता याबद्दल अद्याप काही स्पष्टीकरण देत नाहीयेत. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या आहेत की नाही याबद्दल काहीच स्पष्टता नाही.
