अधोक्षज कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘कमळी’ या मालिकेत काम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्यावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टीका झाली होती. याचं कारण होतं त्याच्या मुलाचं नाव. अधोक्षजने त्याच्या आवडीनुसार आणि अर्थपूर्ण असं मुलाचं नाव ठेवल्यानंतर त्याने सोशल मीडियामार्फत हे चाहत्यांसह शेअर केलं होत, मात्र त्यावेळी त्याला अनेकांनी ट्रोल केलं. अशातच आता टीका करणाऱ्यांना त्याने स्पष्ट उत्तर दिलं आहे.

अधोक्षजने यावेळी ट्रोलिंग आणि टीका करणाऱ्यांकडे तो लक्ष देत नाही असं म्हटलं आहे. अभिनेत्याने यावेळी त्याच्या मुलाच्या नावामुळे त्याच्यावर टीका होऊ शकते याची त्याला कल्पना होती असंसुद्धा सांगितलं आहे. तर यावेळी त्याने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचं उदाहरण देत तो जर त्याच्या धर्मानुसार त्याच्या मुलाचं नाव ठेवू शकतो तर मी माझ्या धर्मानुसार ठेवलं तर काय बिघडलं असा जाब विचारला आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

अधोक्षज काय म्हणाला?

नवराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत अधोक्षजला मुलाच्या नावावरुन ट्रोलिंग झालं होतं त्यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे? असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “हो झालं होतं, पण मी लक्षच दिलं नाही. मला माहिती होतं की हे असंच होणार आहे. कारण आजकाल बारश्यांचे व्हिडीओ टाकतात, मग त्या नावांवरुन ट्रोलिंग होतं, पण तुला खरं सांगू का मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर माझ्या खासगी आयुष्यातील फार गोष्टी पोस्ट करत नाही. नावाच्या ट्रोलिंगसाठी माझी तयारी होती, पण कसं आहे ना आमच्या घरात ज्या स्त्रीया आहेत ना माझी आई, वहिनी किंवा माझी बायको चैताली यांचा या क्षेत्राशी फार काही संबंध येत नाही. त्यामुळे चैतालीला थोडं वाईट वाटलं की अरे आपण इतक्या प्रेमाणे अर्थपूर्ण नाव ठेवलं मग लोक का ट्रोल करत आहेत. “

अधोक्षज याबद्दल पुढे म्हणाला, “मी माझ्या बायकोला सांगितलं की लोकांच्या आयुष्यात हल्ली खूप अडचणी असतात. कोणाचा मुलगा व्यसनाधीन झालेला आहे, कोणाचं बायकोबरोबर पटत नाही, कोणाला शेजाऱ्यांचं चांगलं झालेलं आवडत नाहीये, मग जर कोणाला माझ्या मुलाच्या नावावरुन ट्रोल करुन आनंद मिळत असेल तर घेऊदेत. आपण लक्ष नाही द्यायचं. आपण सोडून द्यायचं आपल्याला माहीत आहे ना की आपण आपल्या मुलाचं नाव छान ठेवलेलं आह. ते धार्मिक आहे, अर्थपूर्ण आहे आणि म्हणता येण्यासारखं आहे तर मग काय हरकत आहे”.

सैफ अली खानचं दिलं उदाहरण

मुलाच्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट उत्तर देत अधोक्षज पुढे म्हणाला, “अजून एक मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीतलंच नाव आहे ना हे? आपल्या हिंदू संस्कृतीतलं, भारतीय संस्कृतीमधलंच नाव आहे ना? जर का एखादा बॉलीवूडचा मोठा सेलिब्रिटी त्याच्या संस्कृतीनुसार त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवू शकतो तर जर एखादा मराठी हिंदू धर्मातील कलाकार त्याच्या संस्कृतीनुसार त्याच्या मुलाचं नाव ठेवत असेल तर काय हरकत आहे. लोकांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि कुठलंही नाव अवघड नसतं आपल्याला बोलण्याची सवय असावी लागते. अक्षोभ्य हे किती छान आणि सोप नाव आहे. म्हणायची सवय नसते आपल्याला.”