Aditi Deshpande shares worked during pregnancy: अदिती देशपांडे यांनी आजवर विविध नाटक, चित्रपट आणि मालिका यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘दशक्रिया’, पक पक पकाक, माई बाप, जोगवा, वजनदार अशा अनेक चित्रपटांमध्ये त्या दिसल्या.
याबरोबरच, अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. फुलाला सुगंध मातीचा, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, मीत अशा मराठी-हिंदी मालिकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.
आता अदिती देशपांडे त्यांच्या कोणत्या भूमिका किंवा चित्रपटामुळे नाही तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मातृत्वाबद्दल वक्तव्य केले.
अदिती देशपांडे यांना मुलाखतीत विचारले की प्रेग्नन्सीदरम्यान ब्रेक घेतला होता का? त्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागली का? त्यावर अदिती देशपांडे म्हणाल्या, “हो, मी प्रेग्नन्सीमध्ये ब्रेक घेतला होता. एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. जेव्हा मी प्रेग्नंट होते, त्यावेळी मी संगीत पूर्णावतार नाटक करत होते. मी तीन महिन्याची गरोदर होते. तोपर्यंत मी नाटक करत होते. त्यावेळी मी आणि माझी अजून एक मैत्रीण त्या नाटकात काम करत होतो.”
“मी ब्रेक घेतल्याची मला चिंता…”
पुढे त्या म्हणाल्या, “डॉक्टर म्हणाले होते की पहिले तीन महिने तुम्हाला पूर्णपणे आराम करायचा आहे. बाकी काही करू नको, असे ते म्हणाले होते. विजय केंकरे यांनी ते नाटक बसवलं होतं. त्यामध्ये गीता म्हणून एक पात्र होतं. कविता आणि डान्स त्या नाटकात होते. माझी दुसरी मैत्रीण होती, ती प्रयोग करू शकणार नव्हती. तेव्हा माझा तिसरा महिना सुरू होता. त्यावेळी एनसीपीएमध्ये दोन प्रयोग लागले होते. मला विजय विचारले की तू करू शकशील का? तेव्हा तिसऱ्या महिन्यात मी ते नाटक केलं. विजय मला म्हणाला की तू काही करू नकोस. तू फक्त स्टेजवर ये. तुझे डायलॉग म्हण आणि जा. अजिबात डान्स करू नकोस. तर तिसऱ्या महिन्यापर्यंत नाइलाज होता म्हणून काम केलं. त्यानंतर पूर्णपणे ब्रेक घेतला.”
अदिती देशपांडे म्हणाल्या, “तो ब्रेक मी ठरवून घेतला होता. खरं सांगते की मी ब्रेक घेतल्याची मला चिंता कधीच नव्हती. परत मला काम मिळेल का, लोक मला विचारतील का, या सगळ्याची मी काळजी केली नाही. तो जो काळ होता, त्याचा मी आनंद घेतला. आई म्हणून ते सव्वा ते दीड वर्षात खूप आनंद घेतला. त्यानंतर अल्फा चॅनेल सुरू झालं होतं.१९९८ ची ही गोष्ट आहे. तर त्यांनी त्यांच्या सगळ्या हिंदी मालिका डब करून मराठीत आणल्या होत्या. तर मी डबिंगने सुरुवात केली. मी एक वर्ष डबिंग करत होते. मला काम मिळेल का, याची मी कधीच काळजी केली नाही. कारण-मला असं वाटलं की ती जर काळजी घेऊन मी जगले तर आताचा माझ्या मुलाबरोबरचा जो काळ आहे, त्याचा आनंद मी कधी घेणार? तसेच, घरूनही काही दबाव नव्हता.”
