लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर सध्या ‘सनई चौघडे’ मालिकेमुळे चर्चेत आहे. तिने या मालिकेत जयच्या आईची म्हणजेच तेजस्विनी खानोलकर ही भूमिका साकारली आहे. अभिनेत्रीने नुकत्याच तिच्या गणेशोत्सवातील खास आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या. मुलगा झाल्यावर अदितीच्या घरी सलग सात वर्षे बाप्पाचं आगमन करण्यात आलं होतं. याशिवाय नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्यावर अदितीला आलेला भावुक अनुभवही तिने यावेळी सांगितला आहे.

अदिती सारंगधर म्हणाली, “मी गर्भवती असताना असं ठरवलं होतं की, बाळ झाल्यानंतर एक वर्ष गणपती बाप्पांना आपण घरी आणूया. मुलगा झाल्यानंतर आम्ही खूप आनंदात आणि उत्साहात गणपती आणला. अगदी साधंच डेकोरेशन केलं होतं. पण, खूप लोक दर्शनाला आले होते आणि जेवणाचाही बेत ठेवला होता. छान तयार व्हायचं, लोकांचं अगत्य करायचं, हा आनंद इतका जास्त होता की, एक वर्ष म्हणता-म्हणता तब्बल सात वर्षं आमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. दिवसाला ५० ते ६० लोक अगदी सहज यायचे. बाप्पाचा नैवेद्य, आपल्या हातचं बनवून पाहुण्यांसाठी प्रसाद करायचा, त्यांचा पाहुणचार करायचा आणि आरती म्हणताना ते मंगलमय वातावरण अनुभवायचं…हा सगळा आनंद काही वेगळाच होता. सात वर्षांनंतर, आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं उद्यापन केलं.”

नाना पाटेकरांच्या घरची आठवण

अदिती सांगते, “यंदाचा गणेशोत्सव तसा आमच्याकडे नाही, पण मित्र-मैत्रिणींकडे गणपती असतात, त्यांच्याकडे मी दर्शनाला जाते. त्यात छान नटूनथटून बाप्पाचं मोहक रूप पाहायला मला खूप आवडतं. मला माझा एक अनुभव आवर्जून सांगायचा आहे. जेव्हा माझ्याकडे गणपतीचं आगमन करत नव्हतो, तेव्हा नीलू ताईंबरोबर मी एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा नाना पाटेकरांच्या घरी, दोन-तीन वर्षं मी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्या बाप्पाकडे बघताच मला रडू यायला लागलं. असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं होतं. वाटत होतं बाप्पा डोळ्यात डोळे घालून आपल्याशी संवाद साधतोय आणि सांगतोय, ‘सगळं ठीक आहे, जे काही चाललंय ते मला समजत आहे, सगळं छान होईल.’ मी माझ्या सगळ्या भावना त्यांच्या समोर मोकळ्या केल्या. तेव्हा मला इतकं समाधान वाटलं की बाप्पा मला समजून घेतोय. तेव्हापासून बाप्पाशी एक वेगळं नातं निर्माण झालं.”

aditi
अदिती सारंगधरच्या घरचा बाप्पा

“गणपती बाप्पा म्हटलं की उकडीचे मोदक आठवतात. वर्षभर आपण डाएट केलेलं असतं, पण मोदक समोर आला, त्याची अशी पातळ पारी दिसायला लागली की आतलं सारण आपल्याला खुणावायला लागतं. त्यावर तुपाची धार सोडायची आणि तो तुपात भिजलेला मोदक खाताना तो तोंडात कधी विरघळून जातो ते कळत नाही. बाप्पा म्हटलं की मोदक, बाप्पा म्हटलं की जास्वंदीचं लाल फूल, बाप्पा म्हटलं की छान आरास आणि भरपूर आरत्या…सर्वत्र अगदी सुंदर वातावरण असतं.” असं अदितीने सांगितलं.