Aditi Sharma Domestic Violence Case : ‘अपोलेना – सपनों की ऊंची उडान’, ‘रब से है दुआ’, ‘कलीरें’ आणि ‘खतरो के खिलाडी १५’ सारख्या लोकप्रिय मालिकांतून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अदिती शर्मा हिने पती अभिनीत कौशिक याच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात अदितीने पती आणि सासरच्यांवर शारीरिक-मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ आणि लग्नाचे सोन्या-हिऱ्याचे दागिने हडपल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. जून २०२१ मध्ये ऑनलाइन क्लासदरम्यान भेट झाल्यानंतर दोघांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अदितीने ३१ जुलै रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने तिची अभिनीतशी कशी भेट झाली आणि तिला पोलिसांत का तक्रार करावी लागली, हे सगळं जबाबात सांगितलं. ५ वर्षांपूर्वी जून २०२१ मध्ये एका ऑनलाइन ॲक्टिंग क्लासदरम्यान तिची पहिल्यांदा अभिनीतशी भेट झाली होती. तीन वर्षांनंतर, सप्टेंबर २०२४ पासून दोघे गोरेगाव पश्चिम इथे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आणि त्यानंतर काही महिन्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्याचं वागणं पूर्णपणे बदलल्याचा दावा तिने केला आहे. तिचे कपडे घालणं, घरातील खर्चासाठी पैसे देण्याऐवजी तिच्याकडूनच पैसे घेणं, अशा कारणांवरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे.
मारहाण, चारित्र्यावर संशय अन्… अदिती शर्माचे आरोप
१ जानेवारी २०२५ रोजी त्यांच्यात कॉफीवरून वाद झाला, त्याचं रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झालं. नंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि तिचं बाहेर अफेअर असल्याचे आरोप केले आणि तिचा फोन सतत तपासू लागला. शेवटी तो वेगळ्या खोलीत झोपू लागला. त्याने तिला तिच्या आई-वडिलांशीही बोलू दिलं नाही.
अदितीने अभिनीतची आई उर्मिला कौशिक (वय ६५) आणि बहीण कीर्ती कौशिक यांच्यावरही आरोप केले आहेत. भांडणात त्या नेहमी अभिनीतचीच बाजू घेऊन तिचा छळ करायच्या. त्याची आई तिचे मंगळसूत्र आणि इतर सोन्याचे व हिऱ्याचे दागिने परत करत नसल्याचा आरोप तिने केला आहे. अदितीने अद्याप याबद्दल जाहीरपणे काहीच वक्तव्य केलेलं नाही, पण गोरेगाव पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तपास सुरू केला आहे.
अभिनीतने अदितीवर केलेले आरोप
मार्च २०२५ मध्ये, अभिनीतने अदितीचं ‘अपोलेना’ मालिकेतील सहकलाकार समर्थ गुप्ता याच्याबरोबर अफेअर असल्याचा आरोप केला होता. अदितीने लग्नासाठी दबाव टाकला आणि हे लग्न लपवून ठेवण्यास सांगितलं. “ती गेल्या दीड वर्षापासून लग्नासाठी माझ्यामागे लागली होती, पण मी तयार नव्हतो. खूप समजावल्यानंतर मी तयार झालो. मात्र, इंडस्ट्रीत लग्न ही एक अडचण मानली जाते, त्यामुळे कोणालाही याबद्दल कळता कामा नये, असा तिचा अट्टहास होता,” असं अभिनीत म्हणाला होता.

अभिनीतने त्यावेळी लग्नाचे काही फोटोही पोस्ट केले होते. इतकंच नाही तर अदितीच्या कुटुंबियांनी २५ लाख रुपये आणि घटस्फोट मागितलाय, असंही त्याने म्हटलं होतं. तसेच अदितीच्या वडिलांनी आपल्याला मारलं होतं, असा दावाही अभिनीतने केला होता.
अदिती शर्माने दिलेलं उत्तर
“लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच मला नात्यात खूप त्रास सहन करावा लागला. मला वाईट वागणूक दिली,” असं अदितीने या आरोपांना उत्तर देताना ‘इंडिया फोरम्स’ला सांगितलं होतं. तसेच “माझं करिअर चांगलं चाललंय, त्या वेळी मी ‘अपोलेना’चं शूटिंग करत होते, मी १८ वर्षांच्या मुलीची भूमिका साकारत होते. त्यामुळे अचानक ही गोष्ट जाहीर करणं योग्य ठरणार नाही, असा विचार करून आम्हा दोघांनीही हे लग्न सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला होता,” असं अदिती शर्मा म्हणाली होती.
