Marathi Actress Wedding: काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

त्याबरोबरच‌लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेदेखील लग्न केले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच, अक्षया हिंदळकर आणि विशाल निकम यांनीदेखील काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

आता या कलाकारांनंतर आणखी एक अभिनेत्री लग्नगाठ बांधणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून एतशा संझगिरी आहे. एतशा संझगिरी आणि निषाद भोईर यांनी काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते. तसेच, काही मुलाखतींमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबद्दलही सांगितले होते.

Award Banner

निषाद आणि एतशा यांची भेट ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांनी चार वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता ते लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

निषाद-एतशाची लगीनघाई

निषाद-एतशाच्या मेंदी, हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘लक्ष्मी निवास’फेम विश्वा म्हणजेच अनुज प्रभू एतशाच्या हळदीला हजर राहिला होता. त्याने सोशल मीडियावर एतशाच्या हळदीतील काही फोटो शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करत त्याने निषादला टॅग केले आणि आम्ही तुझ्याकडे येत आहोत, असे लिहिले आहे. निषादलादेखील हळद लागल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एतशाच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या तुझ्या सोबतीने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तिने यामध्ये नूपुर ही भूमिका साकारली आहे; तर निषाद ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत देवा ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळते.

रेवती लेले अडकणार लग्नबंधनात

एतशा आणि निषादबरोबरच आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे रेवती लेले आहे. काही दिवसांपूर्वीच अंगठीचे फोटो तिने शेअर केले होते. आता तिच्या मेंदीच्या सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, रेवतीचा होणारा नवरा कोण आहे, हे अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.