Rajesh Kumar reveals he sold his car: ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील पात्रांनादेखील मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. मालिकेत राजेश कुमारने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रोसेश साराभाई या त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
राजेश कुमारने जेव्हा अभिनय सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तो मोठ्या चर्चेत आला होता. शेती करायला सुरू केल्यानंतर त्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्याच्यावर जवळजवळ दोन कोटींचे कर्ज होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आता फक्त १०-१५ टक्के कर्ज त्याच्यावर असल्याचे सांगितले होते. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याची कार विकली असल्याचा खुलासा केला. अभिनेता नेमकं काय म्हणाला, हे जाणून घेऊ…
“त्यानंतर जेव्हा मी रिक्षाने जायचो…”
अफताब पुंटोच्या यूट्यूब चॅनेलला अभिनेत्याने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “याआधी मी दिवाळखोर झालो होतो हे सांगितले होते. त्यानंतर जेव्हा मी रिक्षाने जायचो, तेव्हा लोक माझ्याकडे बिचारा म्हणून बघायचे. त्यांना असे वाटायचे मला आता कार परवडत नाही. आता जेव्हा मी खूप काम केल्यानंतर रिक्षाने जातो, त्यावेळी ते मला माझे पाय जमिनीवर आहेत असे म्हणतात.
याच मुलाखतीत त्याने कार का विकली होती, याबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “मी मुंबईतील ट्राफिकमुळे कार विकली. मी बसने प्रवास करत असे. अगदी शूटिंगला जाताना मी ओला किंवा उबर वापरत असे. तसेच मी रॅपिडोसुद्धा वापरत असे. एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचणे हा माझा उद्देश असे, त्यामुळे कोणत्याही वाहनातून प्रवास करायला मला काहीच अडचण नसे. तुमची सोय होणे महत्त्वाचे असते, असे मला शिकवले गेले आहे. दिखावा करणे ही वेगळी गोष्ट आहे. जरी मी महागडी कार घेतली, तरीही मी त्याच ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना त्याच्या चाहत्यांनी त्याला कधी ओळखलं आहे का? असे विचारले. त्यावर तो म्हणाला, “लोक ओळखतात, त्यात काहीच अडचण नाही. लोक येतात, फोटो काढतात. विमानतळावरही चाहते तसेच करतात. अगदी विदेशात फिरत असताना भारतीय समुदायातील लोक तिथे असतील आणि त्यांनी ओळखलं तर ते येतात आणि फोटो काढतात. ज्या क्षेत्रात काम करत आहोत, त्याचे हे फायदे आहेत. तुम्ही स्वत:ला अतिमहत्त्व देणे थांबवले पाहिजे, तुम्ही आनंदी राहाल, तुमचा आंतरिक आनंद सर्वात महत्त्वाचा आहे.”
काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्याने बॉलीवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “मी मित्रांना ताज्या भाज्या, फळे पोहोचवत असे. ते करताना मला दोन कोटींचा तोटा झाला. पण, आता मी त्या आर्थिक संकटातून बाहेर आलो आहे. आता फक्त १० ते १५ टक्के कर्ज माझ्यावर आहे. साधारणपणे ते २० लाख इतके असेल. लवकरच मी लोकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. ते शेतीशी संबंधितच असेल, पण काहीतरी वेगळे असेल.”
तो असेही म्हणालेला, “मी शेती करण्यास सुरुवात केली, कारण मला शेतीची आवड आहे. पण, माझ्या बहिणींनीदेखील शेती करण्यासाठी त्यांच्या नोकर्या सोडल्या. दोघी अमेरिका व फिनलँडच्या नागरिक आहेत. माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या दरम्यान माझ्या मोठ्या बहिणीने तिची नोकरी सोडली आणि भारतात आली. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे, ती माझ्यासाठी वाढदिवसाची भेट होती. ती मला म्हणाली की तू अभिनयावर लक्ष दे, मी शेतीची कामे सांभाळेन. तिच्यानंतर माझ्या लहान बहिणीनेदेखील तिची नोकरी सोडली. मार्च महिन्यापासून तिने शेतीत काम करायला सुरुवात केली आहे.”
