Aishwarya & Avinash Narkar Dance Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचे भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. प्रेक्षकांची ही फेव्हरेट जोडी नुकतीच रॅपर बादशाहच्या ‘चिमणा’ या ट्रेडिंग गाण्यावर थिरकली आहे. या दोघांच्या डान्स व्हिडीओला अवघ्या काही तासांतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
रॅपर बादशाहचं पहिलं मराठी गाणं ‘चिमणा’ हे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या गाण्याचं शूटिंग कोल्हापुरात झालं असून, तेथील लाल मातीच्या कुस्तीची परंपरा या गाण्यात पाहायला मिळतेय. रॅपर बादशाहसह दिव्या कुमार आणि नागेश मोरवेकर यांनीही या गाण्याला आवाज दिला आहे. बादशाहच्या या ‘चिमणा’ गाण्यात हिप-हॉप स्टाईल आणि महाराष्ट्राचं लोकसंगीत यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतोय. या ट्रेंडिग गाण्यावर ऐश्वर्या व अविनाश नारकर सुद्धा थिरकले आहेत.
सुंदर साडी, गळ्यात ठुशी, नाकात नथ या लूकमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहेत. तर, अविनाश नारकरांनी जांभळ्या रंगाचा कुर्ता घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला अभिनेत्रीने अवघ्या दोन शब्दांचं कॅप्शन दिलं आहे. ‘चिमणा-चिमणी’ असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तसेच या कॅप्शनच्या पुढे त्यांनी Evil Eye इमोजी सुद्धा दिला आहे.
दरम्यान, नेटकऱ्यांनी नारकर जोडप्याच्या या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “दोघेही आयुष्याचा निखळ आनंद घेत आहात”, “आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण”, “मला तुमची जोडी खूप आवडते एकदम बिनधास्त”, “याला म्हणतात आयुष्य जगणं”, “लय भारी जोडी”, “एन्जॉय करा असंच आयुष्य” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश सध्या दोघंही छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
