ऐश्वर्या व अविनाश नारकरांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. या दोघांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. नारकर जोडप्याच्या डान्स व्हिडीओची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगते. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी नेहमीच विविध ट्रेंडिंग गाण्यांवर थिरकताना दिसते. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर सध्या दररोज नवनवीन गाणी ट्रेंड होत असतात. अनेकदा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली गाणी सुद्धा नव्याने ट्रेंड होतात, अशाच एका गाण्याने गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

“पोयरी हलु हलु नाच” हे जुनं आदिवासी गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्हायरल गाण्यावर नेटकरी थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ऐश्वर्या व अविनाश नारकरांना सुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. या जोडप्याने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

“मला आवडस तुच एक हिरो बाकी तुझे समोर अख्खे झिरो, बनवीन तुलाच मी हिरो…पोयरी हलु हलु नाच” असे या ट्रेंडिंग गाण्याचे बोल आहेत. लहान मुलांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकजण सध्या या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळतंय.

अविनाश नारकरांनी गॉगल घालून एकदम डॅशिंग लूकमध्ये या गाण्यावर रील बनवलं आहे. ऐश्वर्या यांनी या व्हिडीओवर “The Hero” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय मराठी कलाकारांनी सुद्धा या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं आहे. रेश्मा शिंदेने “क्युटेस्ट कपल” अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे.

तर, अन्य नेटकरी म्हणतात, “हिरो एक नंबर आहे तुमचा”, “आयुष्य खरं कसं एन्जॉय करायचं हे सर आणि मॅडमकडून शिकायला पाहिजे”, “लय भारी डान्स… कमाल नाचलात”, “लाइफ पार्टनर इथपर्यंत साथ देणारा पाहिजे”, “आता तर अजून व्हायरल होईल हे गाणं”, “या वयातही दोघं किती खूश आहेत आणि मुळात एन्जॉय करताहेत”, “लय भारी सुपर डान्स…” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, हे दोघंही सध्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात एकत्र काम करत आहेत. याशिवाय अविनाश नारकर ‘तारिणी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.