Aishwarya Narkar shares Dance Video With Avinash Narkar: ऐश्वर्या नारकर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी सिनेमांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘सून लाडकी सासरची’, ‘राजा पंढरीचा’, ‘घे भरारी’, ‘कलम ३०२’, ‘अरे आवाज कोणाचा’, ‘होऊ दे जरासा उशीर’ अशा अनेक सिनेमांत महत्त्वाच्या भूमिकांत त्या दिसल्या.
ऐश्वर्या नारकर या मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांनी साड्यांचा व्यवसायही सुरू केला आहे. त्यामुळेही त्या अनेकदा चर्चेत असतात.
अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्या बऱ्याचदा त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील खास गोष्टी सांगतात. कधी त्यांच्या व्यायामाचे व्हिडीओ लक्ष वेधून घेतात. तर बऱ्याचदा त्या काही पदार्थांच्या रेसिपी शेअर करतात. या सगळ्यात त्यांचे डान्सचे व्हिडीओ लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळते. ऐश्वर्या नारकर या पती अविनाश नारकर यांच्याबरोबर विविध भाषांतील, जुन्या-नवीन गाण्यांवर ते डान्स करीत असतात.
या जोडीने शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. त्यांच्या डान्स स्टेप्स, डान्स करताना त्यांची मजा, तसेच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचे व्हिडीओ लोकप्रिय ठरतात. आता त्यांचा आणखी एक असाच व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचा ‘शरारा’ गाण्यावर जबरदस्त डान्स
ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अविनाश नारकर ‘शरारा’ या गाण्यावर डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या दोघांच्याही डान्स स्टेप्स वेगवेगळ्या असल्याचे दिसत आहे. तरीही दोघेही डान्सचा आनंद घेत आहेत. व्हिडीओच्या शेवटी ते हसत आहेत. या व्हिडीओवर ऐश्वर्या यांनी लिहिलं की, माझं म्हणणं असतं की मी जसं करते, तसं करा. त्यांचं (अविनाश नारकर) म्हणणं असतं की, माझी स्वत:ची वेगळी स्टाईल आहे. तसेच, त्यांनी व्हिडीओ शेअर करताना, ‘हो की नाही’ अशी कॅप्शन लिहिली आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत त्यांचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “तुम्ही दोघेही खूप क्यूट आहात”, दुसऱ्या एकाने लिहिले, “माझं आवडतं कपल”, आणखी एकाने लिहिले, “सुंदर जोडी”, एकाने लिहिले, “ते डान्स करताना त्याचा आनंद घेतात”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “जबरदस्त एनर्जी”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.




दरम्यान, अविनाश नारकरही विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम आणि झी मराठी वाहिनीवरील तारिणी या दोन मालिकांत महत्त्वाच्या भूमिकांत काम करीत आहेत.
