ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी आहे. अलीकडेच अविनाश नारकर व त्यांच्या बहिणींनी ऐश्वर्या यांचं कौतुक केलं. ऐश्वर्या यांनीसुद्धा अविनाश नारकर यांच्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दल भाष्य करत कौतुक केलं आहे.
ऐश्वर्या नारकर या त्यांच्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक कन्या असून त्या व त्यांचे आई-वडील अशा छोट्या कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्या. मात्र अविनाश नारकर यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर त्यांना मोठ्या एकत्रित कुटुंबात संसार करावा लागला. त्यांच्या दोन मोठ्या नणंदा आजही त्यांच्याबरोबर राहत असून त्यांनी कधीच या गोष्टीची तक्रार केली नाही असं त्यांच्या नणंदांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यावर असलेल्या याच सर्व जबाबदाऱ्या आणि त्यामुळे त्यांनी त्यांना होकार देण्यासाठी घेतलेला वेळ याबद्दल सांगितलेलं.
ऐश्वर्या नारकर यांनी पाहिलेली अविनाश नारकर यांच्या होकाराची वाट
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाल्या, “आपल्याला जाणवत असतं की नाही या व्यक्तीबरोबर मी आयुष्य घालवू शकते किंवा ही व्यक्ती मला आवडते. मग नंतर मला कळलं की त्यालाही त्याच भावना आहेत. ज्यावेळेला मी हे त्याला सांगितलं तेव्हा मी डोंबिवलीला राहायचे. तेव्हा मी ठरवलेलं की जे वाटतं ते आपण बोललं पाहिजे. तो हो म्हणेन किंवा नाही ते जे असेल ते असेल. असं नको व्हायला की काही वर्षांनी मला वाटेल की मी बोलले असते तर कदाचित झालं असतं हुरहुर नको होती आणि तो सगळ्याच दृष्टीने चांगला वाटायचा. जबाबदार होता. त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. तो सगळ्यांचा विचार करणारा होता, स्वत:च्या पायावर उभा होता. इतरांची खूप काळजी घेतो. त्यामुळे मला वाटलं की या माणसाबरोबर मी आयुष्य काढू शकते. हा माणूस माझ्यासाठी योग्य आहे.
ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या, “वयाचं अंतर आहे. पण मी त्याला म्हटलं की मला असं असं वाटतंय त्यावर तो म्हणाला की तू विचार कर अजून कोणीतरी तुला चांगलं मिळू शकेल. अजून तुझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. पण माझं असं होतं की माझा झालाय विचार आता तू विचार कर को तुला अजून कोणीतरी चांगला मिळू शकेल पण त्याच्याकडून होकार होता. त्याच्यातला एक कुठला गुण आवडतो असं सांगता नाही येणार पण तेव्हासुद्धा आमचे खूप वाद व्हायचे. अबोला असायचा आणि मला कळायचंच नाही की माझ्याकडून काहीतरी झालंय. पण खूप छान केमिस्ट्री होती आमची आणि आजही आहे”.
