ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. गेली अनेक वर्षे दोघे एकमेकांबरोबर सुखाचा संसार करत आहेत. दोघे अनेकदा एकमेकांबद्दल तसेच कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलत असतात. अशातच आता अविनाश नारकर यांनी त्यांच्या दोन मोठ्या बहि‍णींबद्दल सांगत त्यांचं कौतुक केलं आहे. तर ऐश्वर्या नारकर यांच्या नणंदांनीसुद्धा त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

ऐश्वर्या नारकर या त्यांच्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यामुळे त्या लहानपणापासून फक्त त्यांच्या आई-बाबांबरोबर अशा छोट्या कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्या. मात्र अविनाश नारकर यांचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यामुळे लग्नानंतर त्यांना मोठ्या एकत्र कुटुंबात राहावं लागलं. मात्र असं असतानाही त्यांनी कधी कुठली तक्रार केली नाही असं अविनाश नारकर यांनी सांगितलं आहे. तर त्यांच्या दोन मोठ्या नणंदांनीसुद्धा त्या त्यांच्याबरोबर एकत्र राहत असूनही ऐश्वर्या यांनी कधीच तक्रार केली नाही असं म्हटलं आहे.

नणंदांकडून ऐश्वर्या नारकर यांचं कौतुक

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अविनाश नारकर यांची मोठी बहीण लता नारकर म्हणाल्या, “त्याने आमच्यासाठी वडिलांपेक्षाही खूप जास्त केलं आणि ऐश्वर्याने त्याला कधी अडवलं नाही.” अविनाश नारकर यांचं कौतुक करत त्यांच्या दुसऱ्या बहीण साधना पुढे म्हणाल्या, “आम्ही ऐश्वर्या वगैरे सगळे असतानाच चर्चा करताना एकदा म्हटलं होतं की समजा आम्ही नाहीच लग्न केलं तर तुम्हाला चालणार आहे ना, कारण कशाला आहेत या दोघी मध्ये उगाच असं नको व्हायला. तर त्यावर ती म्हणाली, जसे आपण बहीण-भाऊ राहतो तसंच राहायचं आहे मग कशाला काही होईल. त्यामुळे या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे”.

ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल त्यांच्या नणंद पुढे म्हणाल्या, “ऐश्वर्या माझं मन आहे. ती थोडीशी अबोल आहे, फार बडबड करायला तिला आवडत नाही”. यावर अविनाश नारकर यांनी सांगितलं की ऐश्वर्या नारकर यांनी लग्नानंतर त्यांचं नाव बदलायचं असं सांगितलं त्यावेळी त्यांच्या धाकट्या बहीण साधना नारकर यांनी त्यांचं ऐश्वर्या हे नाव ठेवलं. त्यांचं आधीचं नाव पल्ल्वी आठल्ये असं होतं.”

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र कुटुंबात राहत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अमेय नारकर, त्यांच्या दोन बहिणी साधना व लता नारकरही राहतात. अविनाश नारकर यांच्या दोन्ही बहिणी अविवाहित असून त्या त्यांच्या भावाबरोबरच एकत्र गेली अनेक वर्षांपासून राहत आहेत.