Aishwarya Narkar Birthday Post : ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘श्रीमंताघरची सून’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. छोट्या पडद्यावर त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. उत्तम अभिनयाप्रमाणेच ऐश्वर्या नारकर त्यांच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखल्या जातात. नियमित योगा करून फिट राहण्याचा सल्ला त्या सर्व चाहत्यांना देत असतात.

प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा आज ५१ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मराठी कलाविश्वातील कलाकारांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्यासाठी अभिनेत्री ईशा संजयने देखील खास पोस्ट शेअर केली आहे. ईशा गेली अनेक वर्षे ऐश्वर्या नारकरांचा मुलगा अमेयला डेट करत आहे. मध्यंतरी सोशल मीडियावरील ‘आस्क मी सेशन’मध्ये ईशाने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली सुद्धा दिली होती. आता ईशाने ऐश्वर्या नारकरांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

ऐश्वर्या नारकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ईशा लिहिते, “माझी सगळ्यात सुंदर मैत्रीण…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जशी आहेस तशीच रहा…आय लव्ह यू” या पोस्टसह अभिनेत्रीने दोघींचे एकत्र सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत.

ईशाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर एका नेटकऱ्याने, “सून ‘स्टार’ आणि सासू ‘सुपरस्टार” अशी कमेंट देखील या पोस्टवर केली आहे.

isha sanjay post
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आस्क मी सेशनमध्ये एका नेटकऱ्याने ईशाला “तुझं लग्न झालंय का दीदी?” असा प्रश्न विचारला होता. यावर अमेय नारकरबरोबरचा फोटो शेअर करत ईशाने, “लग्न नाही झालंय कारण, कोणीतरी खूप दूर आहे सध्या” असं उत्तर दिलं होतं. सध्या अमेय परदेशात त्याचं उच्चशिक्षण पूर्ण करत आहे. मध्यंतरी अमेय भारतात परतल्यावर ईशा त्याच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर पोहोचली होती. या दोघांचा व्हिडीओ तेव्हा व्हायरल झाला होता.