मराठी मनोरंजनसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकरांना ओळखलं जातं. विविधांगी भूमिका साकारून त्यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. याशिवाय त्यांची अन् अविनाश नारकरांची जोडी सुद्धा चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या-अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे सुद्धा चर्चेत असतात. पण, तुम्हाला माहितीये का? ऐश्वर्या नारकरांना अविनाश अनेकदा पल्लू किंवा पल्लवी म्हणतात. कारण, त्यांचं माहेरचं नाव पल्लवी आठल्ये असं होतं.
ऐश्वर्या नारकर नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “१९९५ मध्ये आमचं लग्न झालं..त्यावेळी मला असं वाटायचं अरे जर लग्नानंतर आपलं नाव बदललं तर त्यामुळे लग्न झाल्याचा एक फील येतो. सासरच्यांना सुद्धा असं वाटतं की, ही आपल्यात आलीये…आपली झालीये. जरी तुमचं नाव बदललं तरीही आपले आई-बाबा आणि आपलं माहेर कायम आपल्याबरोबर असतंच. फक्त नाव बदलल्यामुळे असं फार काही होत नाही…आपले संस्कार, आई-बाबांनी आपल्याला दिलेली शिकवण या सगळ्या गोष्टी तशाच राहतात. त्यामुळे, मी अविला सांगितलं होतं की, माझं नाव बदल…कारण, पल्लवी जी मी आतून आहे, ती तशीच राहणार आहे. फक्त नाव बदलल्यामुळे मी बदलणार नाहीये किंवा माझा स्वभाव, माझे संस्कार बदलणार नाहीयेत.”
“साधना ताई ज्या माझ्या नणंद आहेत. त्यांनी माझं ऐश्वर्या हे नाव ठेवलं. त्यांना ऐश्वर्या नाव खूप आवडलं होतं…म्हणूनच त्यांनी हे नाव ठेवलं.” असं अभिनेत्रीने सांगितलं.
याशिवाय वर्षभरापूर्वी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत नाव बदलण्याबद्दल ऐश्वर्या म्हणाल्या होत्या, “माझं आतापर्यंतचं जे अस्तित्व होतं, जगणं होतं, ते आता पूर्णपणे वेगळं होणार आहे. तर ते नावासह होऊ दे. मला वेगळ्या पद्धतीनं जगता येऊ दे, म्हणून अविनाशला सांगितलं होतं की माझं नाव बदलायचं.”
अविनाश नारकर याबद्दल सांगतात, “ती मला म्हणाली होती की, पल्लवी तू म्हण; पण तू दुसरं काहीतरी नाव ठेव. आता ऐश्वर्या हे नाव माझ्या बहिणीनं सांगितलं होतं. मी हे ऐश्वर्याला सांगितलं की, बहिणीने अमुक हे नाव सांगितलं आहे. त्यावर ती ते नाव ठेव, असं म्हणाली.”
दरम्यान, दोघांचं लग्न ३ डिसेंबर १९९५ ला पार पडलं होतं आणि पल्लवी आठल्ये पुढे लग्नानंतर ऐश्वर्या नारकर झाल्या. सध्या ऐश्वर्या नारकर स्टार प्रवाहच्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत.
