ऐश्वर्या नारकर या मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘तुम ही हो बंधु सखा तुम्ही’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दमदार अभिनयाप्रमाणेच ऐश्वर्या त्यांच्या उत्तम फिटनेससाठी देखील ओळखल्या जातात. वयाच्या चाळीशीनंतरही त्यांनी त्यांचा फिटनेस योग्यप्रकारे जपला आहे. याशिवाय अभिनेत्री इन्स्टाग्राम रील्सवर प्रचंड सक्रिय असतात.
सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या नवनवीन गाण्यांवर ऐश्वर्या नारकर व्हिडीओ बनवत असतात. कधी त्या पती अविनाश नारकर यांच्यासह लोकप्रिय गाण्यांवर थिरकतात तर, अनेकदा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील सहकलाकारांबरोबर ऐश्वर्या नारकर भन्नाट रील व्हिडीओ बनवत असतात. त्यांनी या मालिकेतील सह-अभिनेत्रींबरोबर नुकताच एका कोळी गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
ऐश्वर्या नारकर यांच्या जोडीला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री तितीक्षा तावडे, एकता, अमृता रावराणे यांनी मेकअप रुमध्ये कोळी गाण्यावर एकत्र डान्स केला आहे. जयेश पाटीलच्या “कुरले कुरले केस…” या लोकप्रिय कोळी गाण्यावर या अभिनेत्री थिरकल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकरी सध्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय आहे. २०२२ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेली जवळपास दीड वर्षे ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यामधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर यांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षाने ‘नेत्रा’, तर ऐश्वर्या नारकर यांनी ‘रुपाली’ हे पात्र साकारलं आहे. रुपाली हे खलनायिकेचं पात्र असल्याने ती नेहमीच नेत्रा विरोधात कट रचत असल्याचं मालिकेत पाहायला मिळतं. परंतु, प्रत्यक्षात या मालिकेतील सगळ्याच अभिनेत्रींमध्ये खूप सुंदर असं ऑफस्क्रीन बॉण्डिंग आहे. सध्या या अभिनेत्रींच्या कोळी डान्सवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.