Aishwarya Narkar Personal Life Story : मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य आणि करिअरबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी खुलासा केला आहे. ऐश्वर्या यांनी वयाच्या २१ व्या वर्षी अविनाश नारकर यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी नुकतंच त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. पुढे, २३ व्या वर्षी मुलगा अमेयचा जन्म झाल्यानंतरही त्यांनी अभिनयातून कधीच ब्रेक घेतला नाही. यादरम्यान, कुटुंबीयांनी प्रचंड साथ दिल्याचं त्या सांगतात. त्यामुळे आयुष्य आणि करिअरच्या वळणावर नेहमी आयुष्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे, असा महत्त्वाचा सल्ला ऐश्वर्या नारकरांनी दिला आहे.

ऐश्वर्या नारकर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “माझं बीएससी माइक्रोबायोलॉजी पूर्ण झालंय. सुरुवातीपासून मला अभ्यासात खूप जास्त रस होता. पण, माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडत गेली आणि मी त्या गोष्टी स्वीकारत गेले. पहिल्याच नाटकात काम करताना मला अवी भेटला…मग आम्ही प्रेमात पडलो. ज्यावेळी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं म्हणजे… मे-जूनमध्ये अंतिम वर्षाचा निकाल लागला आणि त्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरमध्ये आम्ही लग्न केलं. २१ व्या वर्षी माझं लग्न झालं. मी २३ वर्षांची होते त्यावेळी मला अमेय झाला. यादरम्यान प्रोजेक्ट्स, शूटिंग सुरूच होतं. त्यामुळे मी असं काहीच ठरवलं नव्हतं. मी प्रत्येक गोष्ट आनंदाने करत होते.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “मला कामातून असा कधीच ब्रेक घ्यावा लागला नाही. कारण, गरोदर असताना नवव्या महिन्यात मी एका सिनेमाचं डबिंग करत होते. त्यानंतर अमेयचा जन्म झाला आणि सहा महिन्यांनी मी ‘महाश्वेता’ मालिका केली. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यावर सुरुवातीचे सहा महिने होते तो वेळ मी अमेयला दिला. पण, त्यानंतर ‘महाश्वेता’ मालिकेसाठी मला विचारलं आणि मी तयार झाले…तिच माझी टेलिव्हिजनची पहिली मालिका होती. त्यामुळे असा मोठा ब्रेक घेतलाच नाही. काही ना काही एका पाठोपाठ एक असं सुरूच होतं.”

“या सगळ्या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही एकट्याने हे सगळं करू शकत नाही. मुलाला वेळ द्यायचा असतो, बाहेर कामं असतात…त्यामुळे ती सगळी दोलायमान अवस्था असते. पण, अशा काळात जर तुमच्या पाठिशी तुमची फॅमिली असेल तर खरंच खूप आधार मिळतो.”

“आयुष्य आणि करिअर अशा दोन गोष्टी आपल्यासमोर येतात तेव्हा आपण नेहमीच आयुष्याला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण, आज ना उद्या आपण करिअर करूच शकतो. पण, यादरम्यान आपलं आयुष्य डिस्टर्ब झालं तर आपण करिअरवर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. त्यामुळे आयुष्य अन् करिअर या दोन वाटांच्या मध्ये तुम्ही उभे असाल तेव्हा तुम्ही आयुष्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं…ही माझी मानसिकता आहे. मी सुद्धा या सगळ्याचा काहीच विचार केला नव्हता. जे माझ्या आयुष्यात घडत गेलं ते मी स्वीकारलं.” असं ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं.