Aishwarya Narkar warns fans about a digital payment fraud : हल्ली बहुतांश व्यवहार ऑनलाइन होत असल्यामुळे डिजिटल पेमेंट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या सोयीसोबत फसवणूक आणि स्कॅमच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. सामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत कुणीही याला अपवाद नाही. आता लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही त्यांच्याबरोबर घडलेल्या अशाच एका प्रकाराची माहिती सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

ऐश्वर्या नारकर यांचा साड्यांचा व्यवसाय आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे व सुरुची अडारकर यांच्याबरोबर त्यांनी काही महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता. ज्याला चांगला प्रतीसाद मिळत असल्याचं त्या अनेकदा सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमधून सांगत असतात. हा व्यवसाय त्या ऑनलाइनच करत असून पैशांसंबंधीत व्यवहारसुद्धा ऑनलाइनच होत आहेत. परंतु, त्यांच्या ब्रँडच्या नावाचा वापर करुन कोणातीर लोकांकडून पैसे घेत असल्याचा दावा त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत केला आहे. अभिनेत्रींबरोबर नेमकं काय घडलं आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

ऐश्वर्या नारकर यांच्याबरोबर नेमकं काय घडलं?

ऐश्वर्या नारकर त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल म्हणाल्या, “मी खूप घाईत हा व्हिडीओ करत आहे. कारण – आता जवळपास तिसरी-चौथी वेळ आहे की आमच्याबरोबर असं घडत आहे. थ्रेड अँड ठुमकाच्या नावावर कोणीतरी पैसे घेत आहे आणि त्यांना साड्या देऊ असं खोटं आश्वासन देत आहे. त्यामुळे कृप्या जेव्हा तुम्ही थ्रेड अँड ठुमकाला पैसे पाठवत असाल तेव्हा ते आमचं बिझनेस अकाउंट आहे की नाही हे तपासून घ्या. कारण आमचं अकाउंटसुद्धा त्याच नावाने आहे. आमच्या सोशल मीडियावरील अकाउंटच्या बायोमध्ये व्हॉटएॅप नंबर दिला आहे. पण डीएम करू नका जर तिथे तुम्हाला रिप्लाय मिळाला तर ते नंबर आमचे नाहीयेत. कारण आम्ही नेहमी खासगी मॅसेज करुन रिप्लाय देतो. कुठल्याही कमेंटमध्ये आमचा नंबर देत नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “आम्ही अनेक जणांना ब्लॉक केलं आहे. आतासुद्धा कोणीतरी वेगळंच नाव असलेल्या व्यक्तीला पैसे दिले आहेत. त्यामुळे ते पैसे आमच्यापर्यंत येतच नाहीये. त्यामुळे आम्ही साड्या डिलीव्हर करू शकत नाही. म्हणून पैसे भरताना काळजी घ्या, पेमेंट करण्यापूर्वी नाव तपासून घ्या कारण हा खूप मोठा स्कॅम आहे. पुढे जाऊन हे वाढू शकतं. कारण खूप चुकीच्या वृत्तीचे लोक आपल्या आजूबाजुला वावरत असतात. त्यामुळे तुम्ही कृप्या या फसवणूकीला बळी पडू नका.आता तीन चार घटना घडली आहे.”