Aishwarya Narkar Shared Recipe : ऐश्वर्या नारकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट व वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऐश्वर्या या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे लाखोमध्ये फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियामार्फत त्या त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत असतात.
ऐश्वर्या नारकर इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांच्या लेखी फिटनेसला खूप महत्त्व आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर त्यांचे फिटनेसचे फोटो पोस्ट करत असतात. ऐश्वर्या व्यायाम आणि योगा करून दिवसाची सुरुवात करतात; त्या खाण्यापिण्याच्या वेळाही काटेकोरपणे पाळतात. ऐश्वर्या नारकर अनेकदा त्यांच्या यूट्यूब व्हिडीओंमधून विविध पदार्थांच्या रेसिपी पोस्ट करत असतात. अशातच नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ऐश्वर्या नारकर अनेकदा त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी-निवडी, तसेच घरी बनणारे पदार्थ यांबद्दल सोशल मीडियावरील व्हिडीओंमधून बोलताना दिसतात. अशातच आता नुकतीच त्यांनी एक रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे. जेवणासाठी काय बनवायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो आणि हाच प्रश्न ऐश्वर्या नारकर यांनासुद्धा पडला होता. आता त्यांनी व्हिडीओ शेअर करीत रात्रीच्या जेवणात काय करायचं, असा प्रश्न पडला की, त्या काय खातात याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी घरगुती गोष्टींचा वापर करून बनणाऱ्या एका सोप्या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितली सोपी रेसिपी
सोप्या भाताची रेसिपी शेअर करीत या व्हिडीओमधून ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “आज डिनरला काय करायचं, असा प्रश्न पडला होता. म्हणून हा साधासा भात केला. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, आलं, असं साहित्य होतं आणि तांदूळ आधीच भिजत ठेवलेले, जेणेकरून ते पटकन शिजतात. तुपाची फोडणी महत्त्वाची असते. आलं, लसूण परतल्यानंतर त्यातच मोहरी आणि जिरं घातलं. मग कांदा घातला, तो मऊसर असा परतून घेतला आणि मग कढीपत्ता, टोमॅटो, हळद अशा गोष्टी त्यात घातल्या. त्यानंतर ते परतून घेतलं आणि त्यात हिंग घातलं. मग भिजवलेले तांदूळ घातलं. त्यात लाल तिखट आणि रस्समचा मसाला घातला. छान कढ काढला आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ वाफेवर शिजत ठेवलं. त्यानंतर त्यात मीठ घातलं आणि माझा भात तयार झाला.”
ऐश्वर्या नारकर यांनी पुढे एका प्लेटमध्ये बनवलेला गरम गरम भात, काही दिवसांपूर्वीच बनवलेलं आवळ्याचं लोणचं आणि भातावर तूप टाकून जेवणाचा आस्वाद घेतला.
