Aishwarya Narkar 80s AI Photo Trend : सध्या सोशल मीडियावर ८० च्या दशकातील AI फोटो ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हे फोटो चॅटजीपीच्या मदतीने तयार केले जात आहेत. ८० च्या दशकातील हेअरस्टाइल, तेव्हाचा फॅशन ट्रेंड, अगदी फोटोची क्वालिटी सुद्धा हुबेहूब बदलली जात आहे. कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींना या ट्रेंडची भुरळ पडली आहे. तेजश्री प्रधान, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा सगळ्याच अभिनेत्रींनी हे AI फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आता या पाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी सुद्धा हा AI ट्रेंड फॉलो केलं आहे.
मराठी कलाविश्वातील सदाबहार अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकरांना ओळखलं जातं. गेली अनेक दशकं त्या मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करत आहेत. त्यांनी शेअर केलेला हा रेट्रो लूकमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या लूकमध्ये ऐश्वर्या अगदी ८०-९०च्या दशकातील हिरोईनप्रमाणे दिसत आहेत.
ऐश्वर्या नारकरांनी या फोटोंना ‘TREND AND NOSTALGIA’ असं कॅप्शन दिलं आहे. पूर्वीच्या काळातील पफ स्लीव्ह्ज ब्लाउज, कर्ली हेअरस्टाइल लूकमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तितीक्षा तावडेने या फोटोंवर फायर इमोजी देत कमेंट केली आहे. तर सुरुची अडारकरने कमेंट्समध्ये ‘Ohh विथ फायर’ इमोजी देत ऐश्वर्या यांचं कौतुक केलं आहे. अन्य नेटकऱ्यांनी “जा सिम्रन जी ले अपनी जिंदगी”, “किती सुंदर दिसताय”, “अगदी ८० च्या दशकातील हिरोईनसारख्या दिसताय”, “तुम्ही तुमच्या जुन्या मालिकेतील फोटो शेअर केला असता…तरी ट्रेंड फॉलो झाला असता” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या या फोटोंवर आल्या आहेत.

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या त्या स्टार प्रवाहच्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून, ही मालिका वाहिनीवर सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.
