Aishwarya Narkar Shri Satyanarayan Pooja Video : श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला समर्पित व पवित्र मानला जातो. हा महिना धार्मिक उपक्रमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. श्रावणात मंगळागौर पूजनासह रुद्राभिषेक, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, गृहप्रवेशाची पूजा असे धार्मिक उपक्रम घराघरांत आयोजित केले जातात. गेल्या महिन्याभरात अनेक सेलिब्रिटींच्या घरी श्रावणातील सत्यनारायण पूजा पार पडल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी सुद्धा त्यांच्या घरी पार पडलेल्या पूजेची खास झलक व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली आहे.
नारकरांच्या घरी दरवर्षी श्रावणात सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं जातं. ऐश्वर्या या पूजेची तयारी स्वत: करतात. पहाटे उठून शिरा बनवणं, नैवेद्य करणं, पुरणपोळ्यांचा बेत या सगळ्याची झलक ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाही अतिशय भक्तिमय वातावरणात नारकरांच्या घरची सत्यनारायण पूजा पार पडली आहे.
ऐश्वर्या नारकर म्हणतात, “आमच्या घरी सत्यनारायण पूजा होती…खरंतर आम्ही श्रावणातल्या पौर्णिमेला घरी पूजा करतो. पण तेव्हा ते शक्य झालं नाही…म्हणून दहीहंडीनिमित्त मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी आम्ही घरच्या घरी या पूजेचं आयोजन केलं होतं. यासाठी मी खास प्रसादाचा शिरा केलाय. सुरुवातीलाच तुम्ही छान रवा भाजून घेतला की, शिरा फार उत्तम होतो. याशिवाय सत्यनारायणाच्या पूजेला आमच्या घरी प्रसादाच्या शिऱ्यासह पुरणपोळ्या सुद्धा बनवल्या जातात. आमच्याकडे पुरणपोळ्या बनवताना मूगाची डाळ वापरतात कारण, चण्याच्या डाळीपासून Acidity चा त्रास होतो. म्हणून आम्ही चण्याची डाळ वापरत नाही.”
“आता घरात पूजा पार पडल्यावर खरंच खूप छान वाटतंय. आम्ही दूधी हलवा बनवला होता, छान पुरणपोळ्या बनवल्या होत्या, प्रसादाचा शिरा होता, बटाट्याची भाजी, मसालेभात, टोमॅटोचं सारही बनवलं होतं.” एकंदर पूजा पार पडल्यावर घरात अगदी प्रसन्न वाटल्याचं यावेळी ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं.
ऐश्वर्या नारकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर सुरुची अडारकरने “तू केला शिरा? मलाही हवाय” अशी गोड कमेंट केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “किती सुंदर व्हिडीओ आहे”, “वाह.. ऐश्वर्या मॅडम तुमचा कोणताही व्हिडीओ पाहताना तुम्ही अगदी आम्हाला आपल्यातल्या वाटता”, “सुरेख व्हिडीओ” अशा असंख्य प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, ऐश्वर्या नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या त्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाते.
