Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर आपलं अधिराज्य गाजवत आहेत. सध्या त्या अभिनयाच्या जोडीला सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेल्या डान्स रील्स, फिटनेस टिप्स, योगाच्या व्हिडीओला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र, अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. काही व्हिडीओवर नेटकरी मुद्दाम नकारात्मक कमेंट्स करतात. या सगळ्या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर जशास तसं स्पष्ट भाषेत उत्तर देतात. कमेंट्स अगदीच विचित्र असतील तर त्या थेट स्क्रीनशॉट शेअर करत संबंधित ट्रोलरला जाब विचारतात.

ऐश्वर्या नारकरांनी अशाच एका निगेटिव्ह कमेंटचा स्क्रीनशॉट नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकर यांचं आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष असतं. दररोज सकाळी त्या योगाचे व्हिडीओ शेअर करतात. याशिवाय योगाने आयुष्यात कसा बदल झाला, याचे फायदे काय आहेत हे सुद्धा त्या चाहत्यांना सांगतात. त्यांच्या अशाच एका व्हिडीओवर एका नेटकऱ्याने निगेटिव्ह कमेंट केली आहे. याचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने शेअर केलाय.

हा नेटकरी ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर लिहितो, “निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम…व्हिडीओला व्ह्यूज वाढवण्यासाठी असे कपडे घालून व्हिडीओ बनवता.”

यावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “बुरसटलेले विचार सोडा..तुमचा फोकस का हलतोय? मुद्दा व्यायामाचा आहे. कोणी काय कपडे घालावेत हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या वक्तव्यावरून तुमची अक्कल कळतेच. यापेक्षा व्यायाम करा उपयोगी पडेल.”

पण, ऐश्वर्या नारकरांनी हा स्क्रीनशॉट शेअर केल्यावर संबंधित नेटकरी थांबला नाही त्याने अभिनेत्रीला पर्सनल मेसेज करत “अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात त्याचं काय करायचं?” असा अजब प्रश्न विचारला.

यानंतर अभिनेत्रीने या नेटकऱ्याचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “त्या लहान मुलांना व्यायाम करायला शिकवा…म्हणजे विचारांचा समतोल साधता येईल आणि डोकं शाबूत राहील. नाहीतर मोठी होऊन ती मुलं पण तुमच्यासारखी होतील.”

aishwarya narkar
ऐश्वर्या नारकरांनी शेअर केले स्क्रीनशॉट्स

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी यापूर्वी सुद्धा असंख्य नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरं देत आपली बाजू मांडली आहे. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा मनोरंजन विश्वात उमटवला आहे. सध्या ऐश्वर्या नारकर ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. याशिवाय त्यांनी तितीक्षा आणि सुरुची अडारकर या अभिनेत्रींच्या सोबतीने साड्यांचा व्यवसाय देखील सुरू केला आहे.