Marathi Actors Dance Video : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेपासून ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षा तावडे यांची खूप छान गट्टी जमलीये. मालिका जरी संपली असली तरीही या दोघी कायम एकत्र असतात. याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे ऐश्वर्या व तितीक्षा यांनी एकत्र साड्यांचा बिझनेस सुद्धा सुरू केला आहे. या दोघींनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

ऐश्वर्या नारकर व तितीक्षा यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक खास डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. आता बाप्पाच्या आगमनासाठी जवळपास महिना बाकी राहिलेला असताना ऐश्वर्या-तितीक्षा यांनी गणेशोत्सवातील लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला आहे.

“पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज…” या लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या व तितीक्षा यांनी जबरदस्त डान्स केला आहे. या दोघींना अविनाश नारकरांनी सुद्धा उत्तम साथ दिली आहे. या तिघांच्या एनर्जीचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

ऐश्वर्या, तितीक्षा आणि अविनाश नारकर हे तिघंही अगदी बेभान होऊन ‘पार्वतीच्या बाळा..’ गाण्यावर थिरकले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्री सुरुची अडारकरने या व्हिडीओवर “Hahaha गोड” अशी कमेंट केली आहे.

तर, अन्य नेटकरी म्हणतात, “मस्त डान्स…आपला बाप्पा लवकरच येतोय”, “जीवनात खरा आनंद घेणारा परिवार”, “सरांनी व्हिडीओला चार चांद लावले”, “एक नंबर खूप छान”, “तितीक्षा लय भारी”, “सरांची एन्ट्री लय भारी”, “याला म्हणतात कलाकार… एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट”, “सर मस्त डान्स”, “सरांनी लक्ष वेधून घेतलं” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, या तिघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या नारकरांची ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवीन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अविनाश नारकर ‘तारिणी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तर, तितीक्षा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका संपल्यापासून सध्या आपल्या बिझनेसकडे लक्ष देतेय. याशिवाय ती सोशल मीडियावर विविध रील्स व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.